साईमत, जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. यापुढे प्रशासन अक्षरश: हतबल झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आता वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून शनिवारी पहाटे नाशिक येथील महसूल खात्याचे पथक, स्थानिक महसूल व पोलीस प्रशासन थेट शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीच्या पात्रात उतरत कारवाई केली. यावेळी पोलिसांनी अनेक अधिकृत वाळू वाहून नेणारे जवळपास १०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स व डंपर्स जप्त केले आहेत. त्यामुळे वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जात असल्याचे दिसून आले. मात्र, याकडे महसूल खात्यासह पोलिसांनी अक्षरशः कानाडोळा केल्याचं दिसून येत होते. आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात तर वाळू तस्कर मोकाट सुटले होते. त्यांच्या बदलीनंतर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळू तस्करीला आळा घालणे ही आपली प्राथमिकता असेल असे जाहीर केले होतेे. त्यानुसार मध्यंतरी काही प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी पहाटे २ वाजेपासून नाशिक येथील महसूल खात्याचे पथक हे स्थानिक महसूल व पोलीस प्रशासन थेट गिरणा नदीच्या पात्रात उतरले. यासोबत हे पथक गिरणा पात्राला लागूनच असलेल्या बांभुरीत दाखल झाले. या पथकाने नदीपात्रासह गावात उभे असलेले ट्रॅक्टर्स आणि डंपर्स जप्त केले. येथून जवळपास १०० पेक्षा जास्त वाहने जप्त करून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळपासून बांभोरीसह परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या कारवाईने वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



