रेल्वे अपघातावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवा

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

रेल्वे परिसरात दररोज अपघात आणि आत्महत्यासारख्या घटना घडत आहेत. या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या. रेल्वे अपघातातबाबत करावयाच्या उपाययोजनासाठी भुसावळ रेल्वे प्रबंधक व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार सुरेश भोळे, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, भुसावळ रेल्वे प्रबंधक इति पाण्डेय, विभागीय परिचालन प्रबंधक योगेश पाटील, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किरण पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, रेल्वे क्रॉसिंग करतांना तसेच रेल्वेच्या क्षेत्रात आत्महत्या, नैसर्गिक मृत्यू, वीजेचा शॉक, रेल्वे पोलला धडक अशा घटना नियमित घडत असतात. या घटनांवर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठी रेल्वे प्रशासनाने अपघात प्रवण क्षेत्रांचा शोध घेऊन त्याठिकाणी कंपाउंड वॉलचे बांधकाम करावे. सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. रेल्वे पोलीसांची दैनंदिन गस्त वाढविण्यात यावी. महानगरपालिका व आरोग्य विभागाने संयुक्त विद्यमाने आत्महत्येपासून परावृत करण्यासाठी समूपदेशन शिबिरांचे आयोजन करावे. राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनजागृती करावी.

रेल्वे व आरोग्य प्रशासनाने हेल्पलाईन प्रसिद्ध करावी. हेल्पलाईन क्रमांक सर्वसामान्यांना ठळकपणे दिसून येईल. अशा ठिकाणी प्रदर्शित करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जळगाव -शिरसोली सेक्शनमध्ये प्रभू देसाई नगर, बजरंग बोगदा, गणेश कॉलनी, प्रेम नगर, प्रिंप्राला, खंडेराव नगर, शिव कॉलनी, आशाबाबा नगर, हरिविठ्ठल नगर ह्या भागात आत्महत्या व इतर रेल्वे अपघाताच्या घटना नियमित घडत असतात. त्यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आ.सुरेश भोळे यांनी सांगितले.

आरोग्य प्रशासनाकडून हेल्पलाईन जाहीर

बैठकीत आरोग्य प्रशासनाने नागरिकांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन जाहीर केली. व्यसन, परीक्षेचा ताण, आंतर वैयक्तिक समस्या, बेचैनी, घबराहट, उदासिनता, आत्महत्येचा विचार यांसारख्या समस्यांसाठी टोल फ्री क्रमांक १४४१६/१८००-८९१४४१६ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here