वाढदिवसाला पुस्तके, वह्या देऊन ॲड.रोहिणी खडसे यांचे अभिष्टचिंतन

0
3

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे -खेवलकर यांचा शुक्रवारी, १ डिसेंबर रोजी वाढदिवस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शहरातील संवेदना फाउंडेशन कार्यालयाजवळ जल्लोषात साजरा केला. त्यांनी पहाटे कोथळी येथील श्री संत मुक्ताईचे दर्शन घेतले. त्यानंतर पावसाची रिपरिप सुरु असल्यावरही सकाळपासून चाहते, समर्थक, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पुस्तके, वह्या देऊन ॲड. रोहिणी खडसे यांचे अभिष्टचिंतन केले.

वाढदिवसाच्या दिवशी ‘बुके नको बुक द्या’ असे आवाहन केल्यानंतर बुके ऐवजी पुस्तके शुभेच्छा म्हणून स्वीकारतांना ॲड.खडसे यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते. यावेळी त्या म्हणाल्या की, वाढदिवस सोहळ्यात आलेले पुष्पहार, बुके कोमेजून जातात. अतिशय आकर्षक फुले फेकून देतांना मनाला खूप वेदना होतात. त्यामुळे बुकेऐवजी बुक देण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला. आलेल्या वह्या-पुस्तकांचा लाभ समाजातील गोरगरीब, होतकरू मुला-मुलींसाठी दिला जाईल.विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्नशील असलेल्या मुला-मुलींना पुस्तकेरुपी मदतीचा हात मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच खऱ्या अर्थाने वाढदिवसाची भेट असेल, असे सांगून यापुढेही हाच पायंडा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुरुवातीला मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सर्व विद्या शाखांतर्फे ॲड.रोहिणी खडसे यांचा पुस्तके देऊन वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव चौधरी, संचालक पुरुषोत्तम महाजन, प्रा. आर.पी.बऱ्हाटे, संचालक महेश पाटील यांच्यासह जे.ई.स्कूलचे प्राचार्य आर.पी.पाटील, खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.ए.महाजन, कै.ग.सु.वराडे आयटीआयचे प्राचार्य सुजित पाटील, कोळंबे विद्यालयाचे मुख्याध्यापक मोतीलाल जोगी, रुईखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.पी.भोंबे, निमखेडी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एम.लोंढे, कृषी विद्यालयाचे प्राचार्य घटे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

त्यानंतर दत्तकृपा बुक डेपोचे संग्राम पाटील यांच्याकडून रोहिणी खडसे यांची वही तुला करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी, मुक्ताईनगर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ॲड.रोहिणी खडसे यांना वाढदिवसानिमित्त शुभकामना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here