साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
भडगाव रस्त्यावरील दत्त मंदिरासमोर रस्त्याच्या अर्ध्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या ट्रॅव्हल्स धारकांवर कारवाई करुन अन्य ठिकाणी पार्किंग करावी, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे एपीआय ढिकले यांना बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव शहरातून जळगाव-चांदवड हायवे रस्ता गेलेला आहे. हायवे रस्त्यावर भडगाव रोड दत्त मंदिरासमोर रोडच्या अर्ध्या भागात पुणे, सुरत, मुंबई जाणाऱ्या ट्रॅव्हल्स रात्री ८ वाजेपासून उभ्या असतात. त्यामुळे चाळीसगाव शहरातील नागरिकांना जाण्या-येण्यास मोठी कसरत करावी लागते. याठिकाणी अनेकदा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचा मोठा रोष निर्माण झाला आहे. भविष्यात ट्रॅव्हल्स रस्त्याच्या अर्ध्या भागात उभ्या राहत असल्यामुळे मोठ्या स्वरूपाचा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंग करणाऱ्या ट्रॅव्हलधारकांवर कारवाई करावी, तसेच ट्रॅव्हलची पार्किंगची व्यवस्था अन्य ठिकाणी करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने निवेदन देऊन केली आहे.
निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे पाटील, चाळीसगावचे शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ पाटील, तालुका उपाध्यक्ष कैलास देशमुख, खुशाल पाटील, अशोक भोसले, समर्थ भोसले, चेतन आढाव यांच्यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.