साईमत, जळगाव : प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील मेहुण्याच्या खुनप्रकरणी शालकासह दोघा आरोपींची जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्याद दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन दोन्ही आरोपींना अटक झाली होती. खटल्याच्या सुनावणीचे काम जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालले. खटल्याकामी १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या पुराव्यातील तफावती, अविश्वासार्हता, तपासकामातील त्रुटी आदींचा विचार होऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील श्रीमती सुशिला बालचंद्र चौधरी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात ९ जानेवारी २०२० रोजी फिर्याद दिली होती. त्यात म्हटले होते की, मयत रवींद्र हा त्यांच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान मुलगा होता. त्याला दररोज दारु पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे तो दररोज दारूच्या नशेत त्याची पत्नी सरलाशी भांडण करून तिला मारहाण करीत होता. त्यामुळे सरला अधूनमधून चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे माहेरी निघून जात होती. २ जानेवारी २०२० रोजी ती तरवाडे येथे माहेरी निघून गेली. ती ७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पती रवींद्रसोबत पुन्हा लोहारा येथे आली होती.
त्याच रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी सुशीलाबाई यांना सरला हिने झोपेतून उठवून सांगितले की, तिचा भाऊ गोपाळ नारायण चौधरी आणि त्याचा मित्र कैलास जगन्नाथ चौधरी (दोघे रा. तरवाडे, ता. चाळीसगाव) आलेले आहेत. त्यावेळी सुशीलाबाई यांनी त्यांचा मोठा मुलगा जितेंद्र आणि त्याची पत्नी रेखा यांनाही झोपेतून उठवून बोलाविले. त्यावेळी रवींद्रच्या घरासमोर त्याच्या दोन्ही हातापायांना दोरीने बांधून त्याच्या हातापायांच्यामध्ये लाकडी दांडा फसवून कोलदांडा दिलेला होता. सरलाचा भाऊ गोपाळ चौधरी हा रवींद्रला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत होता. सुशिलाबाई आणि सरलाने आवरण्यास गेल्यावर गोपाळचा मित्र कैलास याने तिला धरून ठेवले. त्यानंतर गोपाळ आणि त्याचा मित्र कैलास हे दोघेही तेथून निघून गेले होते.
त्यानंतर सुशीलाबाईने इतरांच्या मदतीने रवींद्रचे हातपाय सोडून त्याचा कोलदांडा काढला. त्यावेळीही रवींद्र हा दारूच्या नशेत होता. सकाळी पाच वाजता रवींद्र हा कोमात गेल्यामुळे त्याला जळगावच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. त्यामुळे रवींद्रला त्याचा शालक गोपाळ नारायण चौधरी आणि त्याचा मित्र कैलास जगन्नाथ चौधरी या दोघांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन दोन्ही आरोपींना अटक झाली होती.
जळगावच्या न्यायालयात चालले खटल्याचे काम
जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारपक्षातर्फे फिर्यादी सुशीलाबाई चौधरी, जितेंद्र चौधरी, सरला चौधरी, डॉ. विकास पालीवाल, डॉ. निलेश देवराज, पंच, तपासाधिकारी एपीआय रवींद्र बागुल यांच्यासह १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या पुराव्यातील तफावती, अविश्वासार्हता, तपासकामातील त्रुटी आदींचा विचार होऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दोन्ही आरोपींतर्फे जळगाव येथील ॲड. वसंत आर.ढाके यांनी बचावाचे काम पाहिले. त्यांना ॲड. प्रसाद व्ही.ढाके, ॲड. निरंजन व्ही.ढाके, ॲड. शाम जाधव आणि ॲड. डिंपल बऱ्हाटे यांनी सहकार्य केले.