बघता बघता उंची ७ फूट २ इंचांवर

0
11

लखनऊ : वृत्तसंस्था
ट्यूमर शब्द ऐकताच मनात भीती दाटून येते पण तुम्ही कधी अशा ट्यूमरबद्दल ऐकलंय का ज्यामुळे रुग्णाची उंची वाढते? लखनऊच्या लोहिया रुग्णालयात डॉक्टरांनी एका रुग्णावर शस्त्रक्रिया केली.त्याच्या पिट्यूटरी ग्रंथीत ट्यूमर झाल्याने त्याची उंची असामान्यपणे वाढली होती. डोळ्यांची समस्या निर्माण झाल्यावर त्याला याबद्दल समजले. ट्यूमरमुळे त्याची उंची इतकी वाढली की, तो राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच माणूस झाला.
सीरज कुमार असे तरुणाचे नाव असून तो हमीरपूरचा रहिवासी आहे.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरजला लहानपणापासूनच त्याला ट्युमर होता पण त्याकडे कोणाचं लक्ष गेले नाही.सीरज २३ वर्षांचा झाल्यावर त्याच्या दृष्टीवर परिणाम झाला. पाहताना समस्या जाणवू लागल्या. ट्यूमर आधी लहान होता. ग्रंथींमध्ये ग्रोथ हार्मोन्सचं प्रमाण वाढल्यामुळे ट्यूमर तयार झाला. यामुळे सीरजची उंची ७ फूट २ इंचापर्यंत वाढली.
ट्यूमरचा आकार वाढत गेला. तो १२ मिमीवरुन ३.५ सेंटिमीटर झाला. त्यामुळे त्याच्या दृष्टीवर परिणाम झाला. सातत्याने थकवा आणि डोकेदुखीची समस्या उद्भवू लागली. त्याने आरएमएलआयएमएस रुग्णालय गाठले. तिथल्या डॉक्टरांनी एमआरआय काढला. त्यातून ट्यूमर असल्याचे निदान झाले. यानंतर ट्यूमर काढण्यासाठी शुक्रवारी नाकाच्या माध्यमातून मिनिमम इनवेसिव एंडोस्कोपिक सर्जरी करण्यात आली. सीरजची प्रकृती ठीक असल्याने त्याला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून त्याची शस्त्रक्रिया मोफत झाली. सीरजला एपोप्लेक्सीसोबतच पिट्यूटरी एडेनोमा नावाचा दुर्मीळ आजार आहे.हा आजार लाखातील एकालाच होतो, अशी माहिती शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. दीपक सिंह यांनी दिली. ते न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुखदेखील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here