साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वराड बुद्रुक गावात जुन्या वादातून एका तरूणाला शिवीगाळसह मारहाण करत चाकूने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचार घेतल्यानंतर जखमी तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी, २० सप्टेंबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, टिकाराम रामचंद्र पाटील (वय ३८, रा. वराड बुद्रुक ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एक वर्षांपूर्वीच्या जुन्या वादातून गावात राहणारा तुषार भगवान पाटील यांच्यासह इतरांनी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता टिकाराम पाटील याला अश्लिल शिवीगाळ व मारहाण केली. तुषार पाटील याने हातात चाकू घेवून वार करून गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या टिकाराम पाटील यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर टिकाराम पाटील यांनी बुधवारी, २० सप्टेंबर रोजी रात्री धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी तुषार भगवान पाटील, भिकन लक्ष्मण पाटील, बादल मधुकर पाटील, पंडीत किसन पाटील, भटू भासकर पाटील, रितेश ज्ञानेश्वर पाटील (सर्व रा. वराड बुद्रुक, ता.धरणगाव) यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहे.