रनगाव शिवारात घडली घटना
साईमत /मलकापूर/प्रतिनिधी
तालुक्यातील रनगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबल्याने २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मल्हार विनोद फासे (वय २०, रा.हिंगणकाझी, ता. मलकापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रनगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबून गंभीर जखमी झालेल्या मल्हार फासे यांना त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची खबर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. स्वाती पाटील यांच्या वतीने वॉर्ड बॉय राजू तुकाराम गोमटे यांनी दिली.
त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक ०२/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत करण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास हे.कॉ.रविकांत बावस्कार करत आहेत.
