पिंपळगाव जि.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांना घडविले पुणे दर्शन

0
2

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळगाव बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे दर्शन सहलीचे नुकतेच आयोजन केले होते. सहलीचा आर्थिक भार गावातील निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करणारे शांताराम पोपट पाटील यांचे चिरंजीव भारत पाटील यांनी उचलून सहलीचे आयोजन आणि नियोजन करणे सहज शक्य झाले. भारत पाटील यांनी केलेल्या दातृत्वाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुणे येथे विद्यार्थ्यांची दोन दिवस सहल घेऊन जाणे म्हणजे प्रती विद्यार्थी किमान दोन हजार रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु एवढा खर्च ग्रामीण भागातील जि. प. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पेलवणारा नव्हता. अशावेळी गावातील शाळेचे माजी विद्यार्थी तथा इंजिनिअर भारत पाटील (ह.मु.पुणे) यांनी सहलीसाठी पुढाकार घेत सुमारे ८० हजार रुपये सहलीचा खर्चाचा भार उचलुन विद्यार्थ्यांना सहल घडवून आणली. त्यात रेल्वेचे आरक्षण, बस भाडे, निवास, भोजन व्यवस्था स्वखर्चाने उपलब्ध करून दिली. सुरवातीला विद्यार्थ्यांचा खर्च व लांबचा प्रवास यामुळे सहलीस पाठविण्यास पालक सकारात्मक नव्हते. शाळेतील शिक्षकांनी चिमुकल्यांना पुण्यातल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक ठिकाणांना भेट देण्याचा संकल्पच केला होता. सहलीचा प्रवास महाराष्ट्र एक्सप्रेसने पाचोरा रेल्वे स्टेशनवरून पुण्याकडे सुरू झाला.

सहलीचा विद्यार्थ्यांनी पुरेपुर घेतला आनंद

सहलीस ४० विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक असे ५५ जण सहभागी झाले होते. शनिवारवाडा, लालमहाल, नानावाडा, दगडूशेठ हलवाई गणपती, सारसबाग, राजीव गांधी सर्प उद्यान, पर्वती, प्रतिबालाजी, प्रतिशिर्डी, देहू, आळंदी आदी ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक स्थळांना भेटी देत विद्यार्थ्यांनी सहलीचा पुरेपुर आनंद घेतला. विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी सरपंच जयराम पाटील, प्राचार्य संजय पाटील उपस्थित होते.

सहलीचे उत्तम प्रकारे नियोजन

यासाठी मुख्याध्यापक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख सचिन पाटील आणि अमर बरडे यांनी सहलीचे उत्तम प्रकारे नियोजन केले. यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील, सदस्य संजय परदेशी, योगेश ठाकरे, दिवाणसिंग परदेशी, शिक्षणप्रेमी सुरेश पाटील, नरेंद्र पाटील, इंदल परदेशी, नामु दादा यांनी परिश्रम घेतले.

चिमुकल्यांचा आनंद तो माझा आनंद

मी शाळा शिकत असताना ३०० रुपये सहलीची फी देण्याची परिस्थिती माझी नव्हती. म्हणून मी सहलीला जाऊ शकलो नव्हतो, त्याची खंत मला वाटत होती. म्हणून माझ्या गावातील विद्यार्थ्यांना मोफत सहल घडवून आणली. शाळेतील चिमुकल्यांचा आनंद तोच माझा आनंद आहे. शाळेने मला संधी दिल्याबद्दल मनापासून आभारी असल्याचे भारत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here