साईमत जळगाव प्रतिनिधी
सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हि मूल्य जपत भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी दीपस्तंभ मनोबल मध्ये दोन्ही हात नसलेल्या विद्यार्थ्याच्या पायाने ध्वजारोहण करण्यात आले, असा माझ्या आयुष्यातील हा पहिलाच ध्वजारोहण सोहळा आहे, असे प्रतिपादन माजी नौदल व्हाईस ऍडमिरल सुनील भोकरे यांनी केले.
दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्पात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण व सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. मनोबल मधील विद्यार्थी राजेश पिल्ले याला दोन्ही हात नसूनही कॉम्पुटर इंजिनियरिंग पूर्ण करून त्याला टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तो कार्यरत आहे. राजेशने ध्वजारोहण केले आणि त्याच वेळेस दोन्ही हात नसलेल्या माउली अडकूर या विद्यार्थिनीने राष्ट्रगीताची धून पायाने हार्मोनियमवर वाजविली आणि अतिशय प्रेरणादायी वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुखराज पगारिया हे होते. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून अमेरिकेतील उद्योजक एम.के. सत्या, ग्लोबल एक्सपर्टचे प्रशांत देशपांडे, सब लेफ्टनंट अथर्व भोकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रुपेश पाटील यांनी तर आभार नीळकंठ गायकवाड यांनी मानले. सूत्र संचालन दिव्यांग विद्यार्थी ऋषिकेश जगदाळे, जयश्री खैरनार यांनी केले.
या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के बे पाटील यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि डी.लिट.पदवी मिळाल्याबद्दल डॉ.भरत अमळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर दलूभाऊ जैन, पुखराज पगारीया, शिक्षणतज्ञ नीळकंठ गायकवाड, राजेश झोलदेव , जया झोलदेव यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला.
संस्थेचे मुख्य सल्लागार समिती सदस्य व्हाईस ऍडमिरल सुनील भोकरे, आणि माजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांचा निवृत्ती निमित्त विशेष सन्मान करण्यात आला. दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी महत्वाचे योगदान देणारे नाडकर्णी-महाजन असोशिएटस व बीटा कंस्ट्रक्शनचे सदस्य यांचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्पात विविध देशातील विविध जातीची, धर्माची दिव्यांग, अनाथ, वंचित आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. हीच विविधता मनोबल प्रकल्पाची ताकद आहे. हे विद्यार्थी जेव्हा या प्रकल्पातून बाहेर पडतील तेव्हा हा एकात्मतेचा संदेश जगभर पसरेल, अश्या भावना डॉ.के.बी.पाटील यांनी व्यक्त केल्या. आपले मार्गदर्शक भोवतालच्या मित्रांमध्ये, समाजामध्येच असतात ते शोधता आले पाहिजे. प्रत्येकाच्या मनात बघायला शिकलात आणि त्यातून चार गोष्टी घेतल्या तर तुम्ही कधीही एकटे पडणार नाही असा सल्ला डॉ. भरत अमळकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी पुखराज पगारिया, राजेश झोलदेव, नंदकुमार अडवाणी यांनी प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यासाठीचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला.संग्राम जोशी आणि सहकाऱ्यांनी महाराष्ट्र गीताचे सादरीकरण केले. दीपस्तंभ मनोबलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. तर प्रज्ञाचक्षू ममता नाकतोडे व इतर दिव्यांग विद्यार्थ्यांनी देस रंगिला या गाण्यावर नृत्याचे सादरीकरण केले.
राजेश या अनाथ व दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थाने आपल्या मनोगतात तो असा म्हणाला की, ‘’माझ्या आयुष्यात मी असे स्वप्न हे बघितले नव्हते कि माझ्या पायाने ध्वजारोहण होईल. जन्मतः मला हात नसल्याने मी सर्व कामे पायानेच करतो आणि आता नोकरीही करतो. परंतु माझ्या संस्थेने मला हा सर्वोच्च बहुमान दिला त्यामुळे माझा आता अधिक आत्मविश्वास वाढला आहे.’’