राज्य सरकारचे एक पाऊल मागे कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय रद्द

0
8

मुंबई : प्रतिनिधी

शिक्षकांच्या कंत्राटी भरतीवरून राज्यभरात गदारोळ झाल्यानंतर आता अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आधीच्या सरकारांनी केलेले पाप आपल्या माथी नको, अशी भूमिका मांडत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या भरतीला सुरुवात काँग्रेस-राष्ट्रवादीनेच केली होती. २००३ साली काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्यात आली. त्यानंतर २०१० साली अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना दोनदा कंत्राटी भरती काढण्यात आली. २०११ साली पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. २०१३ सालीही अशीच भरती काढण्यात आली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती. मात्र हे लोक स्वत:चं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आता आम्ही अशी भरती रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत,’ असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला.

स्वतःच अपयश झाकण्यासाठी काँग्रेसवर
खापर फोडण्याचा प्रयत्न : अशोक चव्हाण
दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या काळात आम्ही उच्चश्रेणीपद कंत्राटी पद्धतीने भरली नव्हती, स्वतःचं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले. पोलीस, तहसीलदार, नायब तहसीलदार अश्या प्रकराच्या उच्चश्रेणीतील पदे आम्ही कंत्राटी पद्धतीने भरली नाही. स्वतःच उच्च श्रेणीतील पदे कंत्राटी पद भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चतुर्थश्रेणीची पद कंत्राटी पद्धतीने भरले तर समजू शकतो, पण उच्चश्रेणीतील पदे आम्ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा चुकीचा निर्णय घेतला नाही, असे चव्हाण म्हणाले. पत्रकार परिषदे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या काळातलं हे पाप असल्याचे म्हणाले होते, त्यावर प्रतिक्रिया देत पाप , पुण्य आता राहिलं कुठ असा चिमटा अशोक चव्हाण यांनी यावेळी काढला. त्यांना काय एक्सपोज करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती ठीक नाही त्यावर सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे असेही अशोक चव्हाण म्हणाले.

युवा शक्तीचा आणि एकजुटीचा
विजय : रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी कंत्राटी भरती रद्द करण्यासाठी आणि तरुणांच्या इतर मुद्यांच्या पार्श्वभूमीवर युवा संघर्ष यात्रा पुणे ते नागपूर काढणार असल्याची घोषणा केली होती. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा २४ सप्टेंबरला पुण्यातून सुरु होणार होती. ही यात्रा सुरु होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लढा सुरुच राहील, अशी घोषणा केली आहे. याशिवाय सरकारकडे अडीच लाख पदांच्या सरकारी नोकरभरतीची मागणी केली आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय म्हणजे युवा शक्तीचा विजय असल्याचे म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here