ठाकरे घराण्यातच फूट ; बाळासाहेबांच्या सुनबाई शिंदे गटात?

0
3

मुंबई : प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण गढूळ झालं आहे. ठाकरे सरकार गेल्यानंतर बंडखोर आमदार पुन्हा स्वगृही परततील असं बोललं जात होतं. मात्र, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरातच फूट पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचा भाऊ जयदेव ठाकरे यांच्या दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आता ठाकरे घराण्यातील सुनबाई स्मिता ठाकरे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

स्मिता ठाकरे यांनी आज शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले. एकनाथ शिंदे यांना खूप वर्षापासून ओळखते. एकनाथ शिंदे ज्या खुर्चीवर बसले आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे. आदराने आम्ही त्यांच्याकडे पाहतो. यासोबतच एकनाथ शिंदे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत असल्यापासून यांनी केलेले कार्य बघत आहे. कुटुंब म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून मी त्यांना शुभेच्छा द्यायला आले आहे. मी एक एनजीओ चालवते आणि त्यादृष्टीने शुभेच्छा देण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असे त्या म्हणाल्या.

याबाबतच्या बातम्या बाहेर आल्या असून पुढच्या ८ दिवसात त्या शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भेटीनंतर बोलताना स्मिता ठाकरे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्याकडे मी आदराने बघते. ते आमच्यासाठी खूप जुने कार्यकर्ते आहेत. एक व्यक्ती म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहे. यावेळी पत्रकारांनी स्मिता ठाकरेंना तुम्ही शिंदे-ठाकरे कोणत्या गटाला समर्थन करणार का? असा प्रश्न विचारला त्यावर भाष्य करण्याचे स्मिता ठाकरेंनी टाळले. दरम्यान, शिवसेना हा पक्ष सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात विभागला गेला आहे. अशातच स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. मात्र, या भेटीचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. यावेळी स्मिता ठाकरे यांच्यासोबत वेलनेस अंबेसिडर रेखा चौधरी आणि नंदुरबार माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here