पारोळ्याच्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटरला एक लाखाची लाच घेतांना पकडले

0
58

पारोळा पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल

साईमत।जळगाव।प्रतिनिधी।

जळगाव लाचलुचपतच्या विभागाने कामाची वर्कऑर्डर काढण्यासाठी एक लाखाची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवकाला रंगेहात पकडले आहे. सुनील अमृत पाटील (वय ५८) असे ग्रामविस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे तर कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय २८) असे कंत्राटी सेवकाचे नाव आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही लाचखोरांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील तक्रारदार रहिवासी आहे. ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रीट व पेवर ब्लॉक करण्याचे चार कामे प्रत्येकी १५ लाख रुपयाप्रमाणे ६० लाखांचे काम शासनाकडून मंजूर होऊन आले होते. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समितीच्या कार्यालयातील कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यांच्यासाठी दोन टक्के आणि स्वतःसाठी एक टक्क्याप्रमाणे एक लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

पथकाने पडताळणीसाठी रचला सापळा

तक्रारदार यांनी यासंदर्भात जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने पडताळणीसाठी शुक्रवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. यावेळी तडजोडीअंती एक लाख रुपये देण्यासाठी लाचेची रक्कम ठरली. त्यानुसार कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने पंचासमोर एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here