साईमत न्यूज नेटवर्क –
राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. श्रीरामपुरा गावाजवळ धावत्या कारला अचानक आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बोराडा पोलीस ठाणे हद्दीत पहाटे सुमारे साडेपाचच्या सुमारास घडली. माजी सरपंच रामसिंह चौधरी हे आपल्या कुटुंबासोबत आई पूसी देवी यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात होते. पूसी देवी यांना छातीत दुखत असल्याने तातडीने वैद्यकीय मदतीसाठी त्यांना शहराकडे नेले जात होते. मात्र, रुग्णालय गाठण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
प्रवासादरम्यान कारला अचानक आग लागली. काही क्षणांतच आग इतक्या वेगाने पसरली की वाहनातील चौघांनाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. गाडी पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने आत अडकलेल्या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये माजी सरपंच रामसिंह चौधरी, त्यांची आई पूसी देवी, पत्नी सुरज्ञान देवी आणि भाची महिमा यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, सुरज्ञान देवी या जिल्हा परिषद सदस्या असल्याने त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. स्थानिक पातळीवर या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.
प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट किंवा वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून सखोल तपास सुरू आहे.
