जळगाव प्रतिनिधी | जुने जळगावातील विठ्ठल पेठ भागातील “राजा बदाम गल्लीचा” न्यु बाल मित्र मंडळाचा बाप्पा यंदा पुन्हा २४ फुटांचा असणार आहे. विशेष म्हणजे हा बाप्पा मुंबईत साकारण्यात येत असलेली ही भव्य गणेशमूर्ती जळगावात आणण्यासाठी तब्बल ४८ तासांचा बोरिवली ते जळगांव असा प्रवास करावा लागणार आहे.
या मनमोहक गणेशमूर्तीच्या मागील बाजूस कीर्तीमुख व गणपतीच्या दोन्ही बाजूला चमार घेऊन उभे असलेले द्वारपाल असणार आहेत.
मुंबईतील बोरिवली येथील प्रसिद्ध मूर्तिकार किरण जाधव यांच्या कार्यशाळेत ही मूर्ती तयार केली जात आहे. ११ जुलैपासून सुरू झालेले हे काम ६ ऑगस्ट रोजी पूर्ण होईल, त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी मंडळाचे ३० सदस्य ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन मूर्ती घेण्यासाठी मुंबईकडे रवाना होतील. ८ ऑगस्ट रोजी ही मूर्ती घेऊन सदस्य जळगावकडे प्रस्थान करणार आहेत.
मूर्तीचा प्रवास ४८ तासांचा, ढोल ताशांनी स्वागत
मुंबईत बाप्पाचे आगमन वज्रानाद ढोल व ध्वज पथकाच्या गजरात स्वागत करुन होणार आहे. त्यानंतर, भिवंडी, कसारा घाट, इगतपुरी, नाशिक, धुळेमार्गे ४८ तासांचा प्रवास करून ही भव्य मूर्ती जळगावात पोहोचेल.
३ सप्टेंबर रोजी शहरातील वज्रनाथ ढोलपथकाचे एकूण ७० सदस्य ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचा भव्य आगमन सोहळा साजरा करणार आहेत .
या तयारीबाबत माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष भैरव खडके, उपाध्यक्ष तेजस काळे आणि खजिनदार आकाश झोपे यांनी सांगितले की, यंदाचा गणेशोत्सव जळगावकरांसाठी अविस्मरणीय ठरेल. मूर्ती घेण्यासाठी रोहन झोपे, चंद्रकांत पाटील, अनिकेत ढाके, प्रशांत खडके, गुंजन काळे, रोहित नेमाडे, लोकेश खडके, कपिल खडके, उमेश माळी, दुर्वेश झोपे, प्रशांत पाटील, उदय खर्चे, प्रथमेश विसपुते, संकेत झोपे, यश कोल्हे आदी कार्यकर्तेही सोबत रवाना होतील, असे सांगण्यात आले.
(राजा बदाम गल्लीचा) न्यु बाल मित्र मंडळ,जुने जळगांव.
जळगांव मुंबई जळगांव प्रवास
* ६ ऑगस्ट २०२६ ला दुपारी ३:०० वाजता जळगांव वरून बाप्पा ला घेण्यासाठी मंडळाचे ३० सदस्य ट्रॅक्टर ट्रॉलीने बोरिवली (मुंबई) साठी निघणार.
* ८ ऑगस्ट २०२६ शनिवार रोजी सकाळी १०:०० वाजता बोरिवलीच्या सिद्धिविनायक आर्ट्स. मूर्तिकार – श्री किरण जाधव यांच्या कार्यशाळेतून गणपती बाप्पाचे वज्रानाद ढोल व ध्वज पथकाच्या वादनाने आगमन होईल. विशेष म्हणजे हे ढोल पथक ५० सदस्य घेऊन वादनासाठी जळगाव वरून मुंबईला जाणार आहे.
* ८ तारखेला आगमन होऊन बाप्पा जळगांव च्या मार्गाने प्रस्थान करेल भिवंडी बायपास, कसारा घाट, इगतपुरी, नाशिक, धुळे मार्गे जळगाव ला पोहोचेल.
* १० ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत बाप्पाचे जळगांव मध्ये आगमन होईल.
* ३ सप्टेंबर २०२६ ला सायंकाळी ५:०० वाजता बाप्पाचे नेरी नाका ते बदाम गल्लीचा राजा मंडपापर्यंत आगमनाची मिरवणूक चालेल. मिरवणुकीत जळगाव मधील वज्रनाथ ढोल व ध्वज पथक यांचे 70 सदस्य वादन करतील.
