साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जळगाव येथील महाबळ रोड येथील छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात रविवारी झालेल्या ‘दिव्यांग शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांमध्ये जामनेर नगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी अंतर्गत दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी ‘दिव्यांग कल्याण विभाग, ‘दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक आ.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, भुसावळचे अनिल चौधरी, दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष पवन माळी, जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकांत भोसले, देविदास अहिरे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
यावेळी आ. बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधीही मिळाली. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या २५ मदत कक्षांची उभारणी केली होती.