साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
वृत्तपत्रातील छायाचित्रकार हा समाजातील विविध घडामोडींचा जिवंत दस्तऐवज टिपणारा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, या धकाधकीच्या प्रवासात प्रत्येक छायाचित्रकाराने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा मौलिक सल्ला जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी दिला.
प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे १९ ऑगस्ट या ‘जागतिक छायाचित्रण दिना’निमित्त शहरातील केमिस्ट भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करून अतिशय उत्साहात करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख अनिल जोशी, ज्येष्ठ उद्योजक संभाजीराव जाधव, आणि प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनचे अध्यक्ष संधिपाल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान फाऊंडेशनच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भावुक सत्कार करण्यात आला.
महापालिकेकडून सहकार्याचे आश्वासन
कार्यक्रमात बोलताना उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी, “प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या वतीने भविष्यात राबवल्या जाणाऱ्या सामाजिक व व्यावसायिक उपक्रमांना महापालिकेतर्फे नेहमीच पूर्ण सहकार्य केले जाईल,” असे आश्वासन दिले.या कार्यक्रमाला शहरातील आजी-माजी वृत्तपत्र छायाचित्रकार, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी तसेच व्यावसायिक फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित देशमुख, हेमंत पाटील जळगावकर, अभिजीत पाटील, सचिन पाटील, अरुण इंगळे, प्रकाश लिंगायत, जुगल पाटील, पांडुरंग महाले, भूषण पाटील, धर्मेंद्र राजपूत, भूषण हंसकर आणि गोकुळ सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचलन अभिजीत पाटील यांनी केले.
