ढोल-ताशांच्या गजरात शिवभक्तांची पायी वाटचाल;‘हर हर महादेव’च्या घोषात पाचवी कावड यात्रा
साईमत /पाचोरा/ प्रतिनिधी :
‘हर हर महादेव, जय भोलेनाथ’च्या जयघोषाने दुमदुमलेल्या वातावरणात पाचोरा शहरातील पाचवी कावड यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. कावड यात्रा सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत शहरासह परिसरातील असंख्य शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भगवान महादेवाचा जलाभिषेक केला. भगवे ध्वज, ढोल-ताशांचा गजर आणि शिवनामाच्या जयघोषामुळे संपूर्ण मार्गावर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
कावड यात्रेची सुरुवात बामरूड येथील महादेव मंदिरात विधिवत पूजा-अर्चना करून करण्यात आली. त्रिवेणी संगमाचे पवित्र जल कावडीत घेऊन सकाळी सात वाजता शिवभक्तांनी पायी यात्रेला प्रारंभ केला. खांद्यावर कावड घेऊन ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविक मार्गस्थ झाले. बामरूड येथून सुरू झालेली ही यात्रा जयकिरण धाम, निर्मल सिड्स, कैलामाता मंदिर, सिद्धेश्वर महादेव मंदिर, भुयारी मार्ग, जामनेर रोडमार्गे पांचाळेश्वर महादेव मंदिर, चिमुकले महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर कृष्णापुरी या मार्गाने पुढे सरकली.
यात्रेदरम्यान मार्गातील विविध महादेव मंदिरांमध्ये शिवभक्तांनी कावडीतील पवित्र जल अर्पण करून जलाभिषेक केला. ठिकठिकाणी भाविकांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, भगव्या ध्वजांची दिमाखदार उपस्थिती आणि ‘हर हर महादेव’, ‘जय भोलेनाथ’च्या घोषणांनी पाचोरा शहरातील वातावरण अक्षरशः शिवमय झाले होते.
या यात्रेस आमदार किशोर पाटील, वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांनी शिवभक्तांशी संवाद साधून कावड यात्रेला शुभेच्छा दिल्या. यात्रेत सहभागी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी चहा, पाणी, थंड दूध, शरबत तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच बामरूड येथे जाणाऱ्या शिवभक्तांसाठी पाचोरा शहरातील विविध ठिकाणांहून वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
कावड यात्रा सुरळीतपणे पार पडण्यासाठी कावड यात्रा सेवा समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शिवभक्तांनी श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक एकतेचे दर्शन घडविले. पारंपरिक उत्साह, शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे यंदाची कावड यात्रा पाचोरा शहरवासीयांसाठी विशेष आकर्षण ठरली.
