गंगानगर गार्डन परिसरातील पाच ते सात मोठी झाडे तोडल्याचा आरोप; नगरसेविकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
साईमत /यावल / प्रतिनिधी :
शहरातील गंगानगर गार्डन तसेच लगतच्या परिसरातील अनेक वर्षे जुनी, मोठी आणि जिवंत झाडे अज्ञात व्यक्तींकडून तोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तोडण्यात आलेल्या झाडांचे लाकूड अवैधरीत्या वाहतूक करून नेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका तथा गटनेत्या वर्षा आकाश चोपडे आणि भाजप नगरसेविका कल्पना दिलीप वाणी यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेविकांनी दिलेल्या निवेदनानुसार, गंगानगर गार्डन तसेच गार्डनलगतच्या परिसरात अंदाजे पाच ते सात मोठी आणि पूर्णपणे जिवंत झाडे तोडून नेण्यात आली आहेत. ही झाडे अनेक वर्षे जुनी व मोठ्या आकाराची होती. त्यामुळे परिसराच्या पर्यावरणीय समतोलात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. तसेच या झाडांमुळे नागरिकांना सावली मिळत असल्याने परिसरातील रहिवाशांसाठी ही झाडे उपयुक्त ठरत होती.
या प्रकाराबाबत नगरसेविका वर्षा चोपडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील जुनी व जिवंत झाडे कोणत्याही प्रकारे बेकायदेशीरपणे तोडली जाणार नाहीत, यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित व्यक्तीने झाडे तोडण्यासाठी नगरपरिषद अथवा सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतली होती का, याची तपासणी करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्यास त्या परवानगीतील अटी व शर्तींचे पालन करण्यात आले होते का, याचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे नगरसेविकांनी स्पष्ट केले आहे.
तोडण्यात आलेल्या झाडांचे लाकूड नेमके कुठे नेण्यात आले, त्याची वाहतूक कोणी केली, तसेच त्याचा वापर अथवा विक्री कुठे आणि कोणाकडून करण्यात आली, याचाही तपास करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करावा आणि परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवावेत. त्यातून वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यास मदत होऊ शकते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावल शहरातील पर्यावरणाचे संरक्षण हा सार्वजनिक हिताचा महत्त्वाचा विषय असून, नगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वर्षा चोपडे आणि कल्पना वाणी यांनी केली आहे. शहरातील जुनी व मोठी झाडे भविष्यात अशा प्रकारे बेकायदेशीरपणे तोडली जाऊ नयेत, यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
