साईमत -नाशिक – प्रतिनिधी |
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. पंतप्रधान, न्यायालय आणि निवडणूक आयोगाविरोधात ते काय काय बोलतात, हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना काय बडबड करायची ते करू द्या. त्यांच्या बडबडीने काही फरक पडत नाही. आम्ही आमचे काम करत राहू,” असा जोरदार पलटवार महाजन यांनी केला.
संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी नाशिकमधील रस्त्यांतील खड्डे आणि आगामी कुंभमेळ्याच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांच्यावर निशाना साधला होता. तसेच नाशिकमध्ये ‘भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न’ आल्याची टीकाही राऊत यांनी केली होती. त्यांच्या या आरोपांना महाजन यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
‘ठाकरेंचा एक तरी झेडपी अध्यक्ष करून दाखवा’
आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी संजय राऊत यांना थेट आव्हान दिले. “राऊतांनी उगाच बाष्कळ बडबड करू नये. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरेंचा एक तरी झेडपी अध्यक्ष करून दाखवावा,” असे आव्हान महाजन यांनी दिले. तसेच राऊत यांच्याकडे सध्या दोन खासदारांशिवाय किती खासदार राहिले आहेत, असा सवाल करत त्यांनी राऊत यांच्या वक्तव्यांवरही टीका केली.
जयंत पाटलांच्या गैरहजेरीवर मिश्कील टोला
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरही महाजन यांनी मिश्कील टिप्पणी केली. “सध्या फ्लूची साथ आहे, ताप वाढत आहे. त्यांची तब्येत बिघडली असेल, त्यामुळे ते बैठकीला गेले नसतील,” असा टोला महाजन यांनी लगावला.
