साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
खान्देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक सण असलेल्या कानबाई उत्सवाची पाडळसे येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या उत्सवासाठी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले भाऊबंद परिवारासह गावात दाखल झाल्याने संपूर्ण पाडळसे गावाला जत्रेचे स्वरूप आले होते.
पारंपरिक पद्धतीने स्थापना व पूजन
गावातील विजय गुर्जर, रघुनाथ पाटील, भरत गुर्जर आणि बारकू मिस्तरी यांच्या घरी पारंपरिक रीतीरिवाजांनुसार कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. तीन दिवस महिला व ग्रामस्थांनी कानबाई मातेचे दर्शन घेऊन भावपूर्ण पूजा-अर्चा केली. रविवारी रात्री भजन, भक्तिगीते आणि जागरणाचा विशेष कार्यक्रम पार पडला.
ढोल-ताशांच्या गजरात भव्य विसर्जन मिरवणूक
सोमवारी सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू झाली. खान्देशी पारंपरिक वेशभूषेत महिला व मुलींनी कानबाईचे मनोभावे पूजन करून मिरवणुकीत सहभाग घेतला. ढोल-ताशे आणि डीजेच्या तालावर ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.
मिरवणूक जुन्या पाडळसे गावातील अंबिका माता मंदिरात पोहोचल्यानंतर सर्व कानबाईंचे सामूहिक पूजन व आरती करण्यात आली.
त्रिवेणी संगमावर भावपूर्ण विसर्जन
त्यानंतर अनेर-बोरी व तापी नदीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर सर्व भाविक एकत्र आले. तेथे सामूहिक आरती करून यंदाचा खरीप हंगाम भरघोस पिकू दे, शेतकरी व शेतमजूर सुखी-समाधानी राहू देत आणि गावावरील सर्व संकटे दूर होवोत, अशी प्रार्थना मातेच्या चरणी करण्यात आली. त्यानंतर ‘कानबाई माता की जय’च्या जयघोषात कानबाई मातेचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
