कंत्राटी बेस्ट बसचा ब्रेक फेल की चालकाचे नियंत्रण सुटले? सहा वाहनांना धडक ; रिक्षाचालक, पादचारी, दुचाकीस्वार जखमी
साईमत /मुंबई/ प्रतिनिधी :
अंधेरीतील गोखले पुलावर कंत्राटी बेस्ट बसने सहा वाहनांना धडक देत भीषण अपघात घडविल्याची घटना सोमवारी (१७ ऑगस्ट) दुपारी घडली. या अपघातात रिक्षाचालक, पादचारी आणि दुचाकीस्वार असे तिघे जखमी झाले. हँडब्रेक सोडल्यानंतर बस अचानक पुढे सरकल्याने समोर उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक बसल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ओशिवरा आगारातील पीएमआय कंपनीची कंत्राटी बस (मार्ग क्रमांक ए-२२१) अंधेरी पश्चिम बस स्थानकातून वर्सोवा बस स्थानकाकडे जात होती. गोखले पुलावर बस आल्यानंतर चालकाने हँडब्रेक सोडला. त्याचवेळी बस अचानक पुढे सरकल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोर थांबलेल्या वाहनांना बसने जोरदार धडक दिली.
या धडकेत चार रिक्षा, एक एर्टिगा कार आणि एका ॲक्टिव्हा दुचाकीचे नुकसान झाले. अपघातात रिक्षाचालक एनस शेख (५१), पादचारी मनोजकुमार बाजदेव (३०) आणि ॲक्टिव्हा चालक अनिस निसार धारी (२०) जखमी झाले. शेख यांच्या नाकाला, बाजदेव यांच्या मानेला दुखापत झाली असून धारी यांच्या कमरेच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर बसवरील वाहकाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अंधेरी पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपासासाठी अपघातग्रस्त बस कुमकुम चौकी येथे थांबविण्यात आली आहे.
या बसचा चालक कंत्राटी कंपनीचा, तर वाहक बेस्टचा असल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट प्रशासनाकडून खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने भाडेतत्त्वावरील बससेवेला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत कंत्राटी बसच्या अपघातांच्या घटना वाढत असल्याने या धोरणावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कंत्राटी बसचालकांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा दावा केला जात असला, तरी वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चालकांच्या प्रशिक्षणासह त्यांच्या कार्यक्षमतेची आणि सुरक्षाविषयक नियमांच्या पालनाची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे बेस्ट प्रशासनाचे धोरण असताना अशा घटनांमुळे त्या दाव्याची कसोटी लागली आहे.
कंत्राटी बससेवेमुळे खर्चात बचत होत असली, तरी प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड होता कामा नये, अशी मागणी मुंबईकरांकडून होत आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी बसचालकांचे प्रशिक्षण, वाहनांची तांत्रिक तपासणी आणि सुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी याकडे बेस्ट प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
