नशिराबाद प्रतिनिधी | येथील ११० वर्षे पुरातन, तालुका ‘ब’ दर्जाच्या सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पितांबर आमोदकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष जनार्दन शामराव माळी, सेक्रेटरी ॲड. प्रदीप मुरारी देशपांडे, संचालक मिठाराम शामराव म्हसकर, राजेश्वर सखाराम धर्माधिकारी, जितेंद्र देविदास पाटील, बी. आर. खंडारे, प्रा. व्ही. बी. कोष्टी, मनोज अरुण नाईक, संजय पंडित पाटील, ग्रंथपाल सौ. अनुराधा तारकस व सेवक सुधाकर महाजन उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वाचनालयाच्या वतीने आठवडे बाजार परिसरात नवनवीन व अनमोल ग्रंथांचे प्रदर्शन तसेच वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. गावात वाचन संस्कृती रुजावी व ती टिकून राहावी, वाचनालयाची वाचकसंख्या वाढावी, तसेच विद्यार्थी व पालकांचा मोबाईलकडे वाढता कल कमी होऊन त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या ग्रंथ प्रदर्शनास नशिराबादकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध शाळांमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक-शिक्षिका, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन उपलब्ध ग्रंथांची पाहणी केली.
नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र सोनवणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक लालचंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देत उपक्रमास प्रोत्साहन दिले. यावेळी अनेकांनी वाचनालयाचे सभासद होण्याची तयारी दर्शविली.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाच्या पदाधिकारी, संचालक, ग्रंथपाल व सेवकांनी परिश्रम घेतले.
