साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी |
येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय विद्यार्थी सुरक्षा समितीच्या वतीने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नशिराबाद पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांनी जळगाव पोलीस दलाच्या ‘राईज’ उपक्रमाची माहिती देत, अमली पदार्थांच्या सेवनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, शारीरिक व सामाजिक नुकसान कसे होते हे पटवून दिले. अमली पदार्थांची विक्री किंवा हाताळणी करणाऱ्यांविषयी माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत ‘११२’ या क्रमांकाचा वापर करण्याचे सांगण्यात आले.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षा, संशयास्पद लिंक्स आणि वैयक्तिक माहिती न शेअर करण्याबाबत सतर्क करण्यात आले. पोलीस कर्मचारी युगंधरा नारखेडे यांनी विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’ याविषयी मार्गदर्शन करत, अनुचित प्रकार घडल्यास न घाबरता शिक्षक किंवा पालकांना सांगण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमास पोलीस कर्मचारी विशाखा कोकरे, रामकृष्ण माळी, मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे, उपमुख्याध्यापक अनिल चौधरी, पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. के. जोशी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करत उपक्रमाची यशस्वी सांगता झाली.
