जळगाव प्रतिनिधी | भारतीय सैन्यात तब्बल २४ वर्षे देशसेवा बजावून निवृत्त झालेल्या जवान अमोल शामराव साळुंखे यांचे लोणवाडी येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तिरंगा आणि देशभक्तीच्या वातावरणात झालेल्या या सोहळ्यात ग्रामस्थांनी साळुंखे यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव केला.
२४ वर्षांची देशसेवा; वीरपुत्राचा मायभूमीत सन्मान
३१ जुलै २०२६ रोजी सैन्यसेवेतून निवृत्त झाल्यानंतर मायभूमीत परतलेल्या साळुंखे यांच्या सन्मानार्थ ग्रामस्थांच्या वतीने सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी त्यांच्या २४ वर्षांच्या देशसेवेचे कौतुक करत नव्या पिढीसाठी त्यांचा सेवाप्रवास प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
गावच्या सुपुत्राच्या स्वागतासाठी ग्रामस्थ, नातेवाईक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिरंगा व भगव्या ध्वजांनी सजलेल्या वातावरणात साळुंखे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांच्या देशसेवेचा गौरव केला.
