साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
स्व. धीरजभाऊ परदेशी यांच्या हत्येमुळे संपूर्ण समाजात तीव्र संताप पसरला असून या प्रकरणातील आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर म्हणजेच फाशीचीच शिक्षा मिळावी, अशी आक्रमक भूमिका ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेने’ने घेतली आहे. संघटनेच्या जिल्हा शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
या प्रकरणाचा तपास अत्यंत निष्पक्ष व जलदगतीने (फास्ट ट्रॅक) करण्यात यावा. तसेच कोर्टात सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नामवंत कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी करणी सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या
कठोर कारवाई: सर्व आरोपींवर कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्ष आणि गतीने कारवाई व्हावी.
फाशीची शिक्षा: दोष सिद्ध झाल्यावर आरोपींना थेट फाशीचीच शिक्षा मिळावी.
कुटुंबाला संरक्षण व मदत: पीडित परदेशी कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत आणि पूर्ण पोलीस संरक्षण दिले जावे.
निवेदन देताना करणी सेनेचे कार्याध्यक्ष भगवान खंडाळकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंह मोरे, दामोदर राजपूत, संदीप राणा, सारिकाताई पाटील, किरण राजपूत, कविताताई पाटील, जयश्रीताई पाटील, आशिष राजपूत, अजय राजपूत, विकास राजपूत, अभिजित राजपूत, दिलीप पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
