‘एक पेड माँ के नाम’ हा संदेश प्रेरणादायी असून, याच भावनेतून नगरपरिषदेकडून वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत असल्याचे नगराध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण यांनी सांगितले
साईमत /चाळीसगाव/ प्रतिनिधी :
शहराचा विकास करताना पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य देत चाळीसगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण यांच्या पुढाकाराने शहरात सहा हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ नगरपरिषद शाळा क्रमांक दोन, केकी मूस बंगल्याच्या बाजूला नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
या अभियानाच्या प्रारंभप्रसंगी उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, नगरसेवक राहुल म्हस्के, धर्मराज बच्छे, नगरपरिषदेचे अभियंता देवेंद्र शिंदे, आरोग्य निरीक्षक विजय जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक, नगरपरिषदेचे कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या माध्यमातून शहराच्या पर्यावरणीय समृद्धीला चालना देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण यांनी सांगितले की, आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतील ‘द बेस्ट चाळीसगाव’ साकारताना केवळ रस्ते, गटारी आणि अन्य पायाभूत सुविधा उभारणे पुरेसे नाही. शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याबरोबरच नागरिकांना निरोगी व पर्यावरणपूरक वातावरण मिळणेही तितकेच आवश्यक आहे. आज लावण्यात येणारी रोपे भविष्यात मोठे वृक्ष बनून पुढील पिढ्यांना प्राणवायू, सावली आणि पर्यावरणीय समतोल देणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.
पर्यावरण संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा संदेश प्रेरणादायी असून, याच भावनेतून चाळीसगाव नगरपरिषदेकडून वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत असल्याचे नगराध्यक्षा चव्हाण यांनी सांगितले. वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
“वृक्षारोपण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून त्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे. आपल्या परिसरात ज्या ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाईल, त्या प्रत्येक रोपाची काळजी घेण्याची सामूहिक जबाबदारी नागरिकांनी स्वीकारावी,” असे आवाहन नगराध्यक्षा चव्हाण यांनी केले.
नगरपरिषदेच्या नियोजनानुसार शहरातील विविध शाळांचे परिसर, सार्वजनिक मोकळी मैदाने, रस्त्यांच्या दुतर्फा, शासकीय जागा तसेच विविध प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने सहा हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमातून शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याबरोबरच भविष्यात तापमान नियंत्रण, वायुप्रदूषण कमी करणे, मातीची धूप रोखणे आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे.
शहराचा नियोजित विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने सुरू केलेल्या या अभियानाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि विविध स्तरांतील नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची भूमिका घेतल्यास ‘हरित चाळीसगाव’चा संकल्प प्रत्यक्षात उतरू शकतो. शहराच्या भविष्यातील पर्यावरणीय समृद्धीसाठी सहा हजार वृक्षांचे हे अभियान महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
