गर्दीचा फायदा घेत ‘धक्का टोळी’चा धुमाकूळ; १३५ महागडे मोबाईल जप्त बेस्ट बस, बसथांबे आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लक्ष्य; सात जणांना अटक
मुंबई :
बेस्ट बस तसेच रेल्वे स्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना धक्काबुक्की करून महागडे मोबाईल लंपास करणाऱ्या सराईत टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तब्बल दोन महिने पाळत ठेवून पोलिसांनी टोळीतील सात जणांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे १२ लाख ७० हजार रुपये किमतीचे १३५ महागडे स्मार्टफोन जप्त करण्यात आले आहेत. चोरीचे मोबाईल बांगलादेश आणि नेपाळमध्ये निम्म्या किमतीत विकण्याचा टोळीचा डाव असल्याचे तपासात समोर आले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून ही टोळी मुंबई आणि परिसरात सक्रिय होती. परदेशात मोबाईल पाठविण्यापूर्वी तब्बल एक हजार मोबाईल चोरण्याचे लक्ष्य टोळीने निश्चित केले होते. प्रवाशांकडे एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा मोबाईल असल्याचे लक्षात येताच त्यांना लक्ष्य केले जात असे. गर्दीच्या ठिकाणी चार ते पाच जणांचा घोळका करून संबंधित प्रवाशाचे लक्ष विचलित केले जात असे. त्यानंतर टोळीतील एक सदस्य संधी साधून मोबाईल चोरत असे.
टोळीने चोरीसाठी प्रत्येक सदस्याला विशिष्ट भूमिका आणि सांकेतिक नाव दिले होते. मोबाईल लंपास करणाऱ्या सदस्याला ‘मशीन’ म्हटले जात असे. चोरी केलेला मोबाईल तातडीने बॅगेत ठेवण्याचे काम करणाऱ्या सदस्याला ‘छप्पर देनेवाला’ असे संबोधले जात होते. त्यानंतर मोबाईल पुढील सदस्याकडे सोपविणाऱ्या व्यक्तीला ‘चार्मर’, तर मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पसार होणाऱ्या सदस्याला ‘बूर’ असे नाव देण्यात आले होते. उर्वरित सदस्य प्रवाशाला धक्काबुक्की करून त्याचे लक्ष विचलित करण्याचे तसेच त्याला तत्काळ प्रतिक्रिया देण्याची संधी न देण्याचे काम करत. या सदस्यांना ‘ठेकेदार’ असे संबोधले जात होते.
विशेष म्हणजे, या सांकेतिक नावांचा वापर टोळीतील सदस्य एकमेकांशी संपर्क साधताना व्हॉट्सअॅपवर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अंधेरी आणि नवी मुंबई परिसरातील गर्दीच्या बेस्ट बस, बसथांबे तसेच रेल्वे स्थानकांच्या बाहेरील भागांची पाहणी करून टोळी प्रवाशांना हेरत होती. गेल्या दीड महिन्यातच त्यांनी १३५ महागडे स्मार्टफोन चोरल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.
एमआयडीसी पोलिसांच्या या कारवाईमुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात जून आणि जुलै महिन्यात घडलेले दोन मोबाईल चोरीचे गुन्हे तसेच अंधेरी पोलिस ठाण्यात नोंद असलेला आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. ६ जून रोजी अंधेरी पूर्वेकडील सीप्झ बसथांब्यावर बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका ओएनजीसी कर्मचाऱ्याचा सुमारे ९० हजार रुपये किमतीचा मोबाईल या टोळीने लंपास केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान शिवाजीनगर, गोवंडी आणि कल्याण परिसरातील मोबाईल चोरांच्या टोळीचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकाबाहेरील बसथांब्यावर सापळा रचला. या कारवाईत टोळीतील सात जणांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसीम सलीम शेख (३५), अझहर मुकीम मिर्झा बेग (२२), फिरोज उर्फ जाहिद हुसेन खान (३७), दिलशाद अहमद अली बेग (२८), मुबीन उर्फ एमके जहरीला बाबू रजा खान (२९), आबिद अली अजगर अली शेख (२८) आणि सुशील कुमार छत्रधारी सिंह (३४) यांचा समावेश आहे. पोलिस तपासानुसार वसीम हा ‘मशीन’, अझहर ‘छप्पर देनेवाला’, फिरोज ‘चार्मर’ आणि दिलशाद ‘बूर’ म्हणून काम करत होते, तर इतर आरोपी ‘ठेकेदार’ म्हणून टोळीला मदत करत होते.
पोलिसांनी या टोळीच्या कार्यपद्धतीचा बारकाईने अभ्यास केला असता गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना घेरून त्यांचे लक्ष विचलित करणे, धक्काबुक्कीच्या गोंधळात मोबाईल काढून घेणे आणि काही क्षणांत तो दुसऱ्या साथीदाराकडे सोपवून घटनास्थळापासून दूर जाणे, अशी त्यांची नियोजनबद्ध पद्धत असल्याचे उघड झाले.
पश्चिम प्रादेशिक विभाग तीनचे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त योगेश शिंदे, वरिष्ठ निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक सुनील कारंडे, उपनिरीक्षक किरण नवले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलच्या आधारे टोळीने केलेल्या आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू असून, चोरीचे मोबाईल परदेशात पाठविण्याच्या त्यांच्या नेटवर्कचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
