अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांचा दणका; २४ लाखांचा मुद्देमाल नष्ट, ८२ गुन्हे दाखल
साईमत /जळगाव / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी सोमवारी जिल्हाभरात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत हातभट्टीच्या दारूविक्रीप्रकरणी तब्बल ८२ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईदरम्यान २२ हजार २३ लिटर गावठी दारू, रसायन तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २४ लाख १३ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
जिल्ह्यात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली. गावठी दारूमुळे सार्वजनिक आरोग्य तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी संशयित ठिकाणांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात दारू व दारू निर्मितीचे साहित्य जप्त करून नष्ट केले.
या विशेष मोहिमेचा व्याप केवळ अवैध दारूविक्रीपुरता मर्यादित न राहता पानटपऱ्या आणि भंगार दुकानांपर्यंत वाढविण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल ११३ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात दुकानांमध्ये संशयास्पद स्वरूपाचा माल आढळून आल्याने संबंधित मालावर पोलिसांनी कारवाई केली. चोरीचा किंवा गुन्ह्यांमध्ये वापरला गेलेला माल भंगाराच्या माध्यमातून विक्रीस येत नाही ना, याचीही पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातील १७७ पानटपऱ्यांचीही तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन अथवा संशयास्पद बाबी आढळलेल्या ३१ पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अवैध व्यवसायांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देणाऱ्या ठिकाणांवरही पोलिसांची नजर असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारूविक्रीसह इतर अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध व्यवसायांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नसून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
