साईमत न्यूज नेटवर्क –
अकोला : शेती आणि संपत्तीच्या वादातून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे घडली. अमोल गजानन मालोकार असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईक असलेल्या चुलत भावानेच हा खून केल्याची माहिती प्राथमिक पोलिस तपासातून समोर आली असून, आरोपी सध्या फरार आहे.
अकोला शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबी मालोकार गावातील शेतशिवारात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. शेती आणि संपत्तीच्या वादातून अमोल याच्यावर त्याच्या दूरच्या चुलत भावाने गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने अमोलच्या कानाजवळ तसेच शरीराच्या अन्य भागावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या अमोलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
शेतकरी कुटुंबातील संपत्तीचा वाद थेट रक्तरंजित संघर्षात बदलून तरुणाचा जीव गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेतील संशयित आरोपी अजय हा अमोलचा चुलत भाऊ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. गोळीबार केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार स्वतंत्र पथके तयार केली असून, विविध ठिकाणी त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, अकोल्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मृत अमोलच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हत्येमागील नेमका वाद, गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
नातेवाईकांतील शेती व संपत्तीच्या वादातून झालेल्या या रक्तरंजित घटनेमुळे निंबी मालोकार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीच्या अटकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
