साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबई : हॉर्मुझची सामुद्रधुनी नेमकी कधी आणि कोणत्या अटींवर खुली होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. इराणकडून ओमानसोबतच्या सागरी वाहतुकीसंदर्भातील करार अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले असले, तरी अमेरिकेशी संबंधित काही अटी पूर्ण झाल्यानंतरच हॉर्मुझचा मार्ग खुला केला जाईल, अशी भूमिका इराणने कायम ठेवली आहे. त्यामुळे तेलाच्या पुरवठ्याबाबतची चिंता वाढली असून, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या दरात १.०९ टक्क्यांची वाढ होऊन तो प्रति बॅरल ८४.४६ डॉलरवर पोहोचला. त्याचवेळी अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट अर्थात डब्ल्यूटीआयच्या वायदा दरात ६१ सेंट्स म्हणजेच ०.७८ टक्क्यांची वाढ झाली असून, तो प्रति बॅरल ७८.७९ डॉलरवर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात मात्र तेलाच्या दरांमध्ये लक्षणीय घट झाली होती. हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरच वाहतुकीसाठी खुली होईल आणि इराण-ओमानदरम्यानचा करार मार्गी लागेल, अशी शक्यता बाजारात निर्माण झाली होती. या अपेक्षेमुळे ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय या दोन्ही प्रमुख तेल निर्देशांकांच्या दरात सात टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. मात्र, मार्ग खुला होण्याबाबतची अनिश्चितता कायम राहिल्याने तेल बाजारातील तेजी पुन्हा परतली आहे.
जागतिक तेल पुरवठ्याच्या दृष्टीने हॉर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. युद्ध सुरू होण्यापूर्वी जगातील एकूण तेल वाहतुकीपैकी सुमारे एक पंचमांश वाहतूक या सामुद्रधुनीतून होत होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यास जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांची नुकसानभरपाई देण्याची मागणी इराणने पुन्हा एकदा पुढे केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रविवारी अमेरिकेसोबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेने जूनमध्ये झालेल्या अंतरिम कराराचे पालन केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अमेरिकेने करारातील अटींचे पालन करेपर्यंत चर्चेला सुरुवात केली जाणार नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे.
याचदरम्यान, आखाती प्रदेशातील तेल पुरवठ्याच्या साखळीसमोर आणखी एक संकट निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस सौदी अरेबियातील एका तेल प्रकल्पावर हल्ला झाल्याचे समोर आले. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आखातातील तणाव वाढत असताना सौदी अरेबियाने तुर्किये आणि पाकिस्तान या मित्रराष्ट्रांसोबत संरक्षण करार केला आहे.
या करारानंतर अवघ्या दोन दिवसांत इराणसमर्थित हूती बंडखोरांनी सौदी अरामकोच्या जझान येथील रिफायनरीला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आखाती देशांमधील तेल उत्पादन आणि वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता अधिकच वाढली आहे.
संघर्षाचा परिणाम समुद्री वाहतुकीवरही होत असल्याचे चित्र आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या अडनोक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, संघर्ष सुरू झाल्यापासून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या त्यांच्या १५ जहाजांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे तेलाच्या उत्पादनाबरोबरच त्याच्या वाहतुकीवरही संकट निर्माण झाले असून, हॉर्मुझचा मार्ग पूर्ण क्षमतेने खुला होण्यास आणखी विलंब झाल्यास जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरांवर पुन्हा दबाव वाढण्याची शक्यता आहे.
