तारेत उच्चदाबाचा प्रवाह सुरूच असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप; नुकसानभरपाईची जोरदार मागणी
साईमत -ममुराबाद- प्रतिनिधी |
महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा आणखी एक बळी ममुराबाद शेतशिवारात गेला असून, बांधावर तुटून पडलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने एका बैलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (९ ऑगस्ट) सकाळी घडली. या घटनेत जवळच काम करणारे दोन ते तीन शेतमजूरही विजेच्या धक्क्याने थोडक्यात बचावले असून, मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील शेतकरी शरद पुंडलिक नारखेडे (वय ४५) यांच्या शेतात रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कोळपणी व शेतीची कामे सुरू होती. याच दरम्यान शेताच्या बांधावर आधीपासूनच तुटून पडलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श अचानक बैलाला झाला. या तारेत वीजप्रवाह सुरू असल्याने बैलाला भीषण झटका बसला आणि उपचाराची संधी मिळण्यापूर्वीच त्याचा तडफडून मृत्यू झाला. बैलाला वाचवण्याच्या प्रयत्नात व संपर्कात आल्याने बाजूला काम करणाऱ्या शेतमजुरांनाही विजेचे झटके बसले, मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला.
नव्याने घेतलेला बैल गमावल्याने शेतकरी उघड्यावर
विशेष म्हणजे, शरद नारखेडे यांनी शेतीच्या ऐन हंगामात कामाला गती मिळावी म्हणून काही दिवसांपूर्वीच मोठी पुंजी साचवून नवीन बैलजोडी खरेदी केली होती. त्यातील एका बैलाचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे नारखेडे कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. ऐन पेरणी-कोळपणीच्या दिवसांतच मुख्य आधार हिरावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महावितरणच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थांचे ताशेरे
वीजतार तुटून बांधावर पडलेली असतानाही वीजपुरवठा खंडित का झाला नाही? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. महावितरणच्या सुस्त आणि बेजबाबदार कारभारामुळेच हा अपघात घडल्याचा थेट आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
नुकसानभरपाई अन् जीर्ण तारा बदलण्याची मागणी
या घटनेनंतर ममुराबाद परिसरात शेतकर्यांमध्ये तीव्र भीती व संतापाचे वातावरण आहे. महावितरणने संबंधित घटनेची सखोल चौकशी करून पीडित शेतकरी शरद नारखेडे यांना तातडीने योग्य ती भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. तसेच ममुराबाद व लगतच्या शेतशिवारातील जीर्ण, लटकणाऱ्या व धोकादायक वीजवाहिन्यांचे तात्काळ सर्व्हेक्षण करून दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात मानवी जीवनाला धोका निर्माण झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
