जळगाव प्रतिनिधी | “देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. मात्र त्यांच्या त्यागाची स्मृती जपणे, त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि भावी पिढीसमोर त्यांचे शौर्य जिवंत ठेवणे, हीच शहीदांना खरी मानवंदना आहे. शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा आहे,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित ‘शहीद स्मारक भूमिपूजन व कृतज्ञता सोहळा’ तसेच ‘वीर माता, वीर पिता, वीर पत्नी सन्मान सोहळ्या’त ते बोलत होते.
जिल्ह्यातील शहीद जवानांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांच्या गावांमध्ये स्मारके उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, २९ शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सूती तिरंगा हार व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
पुढे वीर परिवार… मागे मंत्री-लोकप्रतिनिधी; पोलीस बँडच्या सुरांत शहीदांना मानवंदना
कार्यक्रमाची सुरुवातच अत्यंत शिस्तबद्ध आणि राष्ट्रभक्तीने भारलेल्या वातावरणात झाली. पोलीस बँड पथकासोबत अग्रभागी वीर माता, वीर पिता, वीर पत्नी आणि शहीद जवानांच्या परिवारातील सदस्य होते; त्यांच्या पाठीमागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, उपस्थित आमदार व लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. शहीदांच्या कुटुंबीयांना अग्रस्थान देणारे हे दृश्य उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले.
बँडच्या शिस्तबद्ध संचलनात सर्वजण भूमिपूजनस्थळी पोहोचले. तेथे क्रांतिकारक आणि शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत शहीद स्मारकांचे भूमिपूजन करण्यात आले.
जिल्हा नियोजन कार्यालयासमोरील परिसरात उभारण्यात आलेला भव्य शामियाना, आकर्षक रांगोळ्या आणि देशभक्तीचा जागर करणारी सजावट यामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते.
२९ गावांची माती एकवटली; जणू २९ वीरभूमी एकत्र आल्या
सोहळ्याचे सर्वाधिक भावस्पर्शी वैशिष्ट्य म्हणजे ज्या २९ गावांमध्ये शहीद स्मारके उभारण्यात येणार आहेत, त्या प्रत्येक गावातून आणलेली माती स्वतंत्र कलशांमध्ये ठेवण्यात आली होती. त्यानंतर या २९ वीरभूमींची माती एकत्र करण्यात आली. वेगवेगळ्या गावांतून आलेली ती माती एका ठिकाणी एकवटली तेव्हा जणू २९ गावांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेम एका सूत्रात बांधले गेले, अशी भावना निर्माण झाली.
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या स्मृती त्यांच्या गावात कायमस्वरूपी जतन करण्याचा हा अभिनव उपक्रम राज्यात प्रथमच जळगाव जिल्ह्यात अशा स्वरूपात प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आला आहे. ही स्मारके केवळ वास्तू न राहता भावी पिढीला देशसेवा, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारी केंद्रे ठरणार असल्याने हा ‘जळगाव पॅटर्न’ राज्यासाठी आदर्श ठरणार आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शहीद जवान हा केवळ एका कुटुंबाचा किंवा एका गावाचा नसतो; तो संपूर्ण राष्ट्राचा असतो. ज्या माता-पित्यांनी आपला सुपुत्र देशासाठी दिला, ज्या पत्नीने आपल्या जीवनसाथीचे बलिदान स्वीकारले आणि ज्या परिवाराने आपल्या माणसाला मातृभूमीसाठी समर्पित केले, त्या प्रत्येक कुटुंबाच्या त्यागापुढे संपूर्ण समाजाने कृतज्ञतेने नतमस्तक झाले पाहिजे.
“शहीदांच्या गावात उभी राहणारी ही स्मारके दगड-मातीच्या वास्तू नसतील. त्या स्मारकातील प्रत्येक दगड पुढच्या पिढीला सांगेल की, या मातीत असा एक वीर जन्मला होता, ज्याने स्वतःच्या प्राणांपेक्षा देशाला मोठे मानले. गावातील विद्यार्थ्यांनी या स्मारकातून आपल्या वीराचा इतिहास जाणून घ्यावा, तरुणांनी त्यातून देशसेवेची प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रभक्तीची ज्योत पिढ्यान्पिढ्या तेवत राहावी, हाच या उपक्रमाचा खरा उद्देश आहे. स्मारके उभारल्यानंतर त्यांच्या नियमित देखभाल व दुरुस्तीचे नियोजन ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
देशसेवेची भावना नव्या पिढीत रुजेल – संजय सावकारे
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, देशाच्या सीमांवर जवानांनी दिलेल्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. सैनिकांबरोबरच देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखणाऱ्या पोलीस दलाचे योगदानही तितकेच मोलाचे आहे. शहीदांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनात देशसेवा व राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी ही स्मारके कायमस्वरूपी प्रेरणास्थळे ठरतील, असे त्यांनी सांगितले.
शहीदांच्या परिवारासोबत शासन खंबीरपणे – राजू मामा भोळे
आमदार राजू मामा भोळे म्हणाले की, शहीद जवानांचे बलिदान एका कुटुंबाचे दुःख असले तरी ते संपूर्ण देशासाठी अभिमानाचे आहे. त्यांच्या त्यागातून नवयुवकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळत राहील. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी खंबीरपणे उभे असून त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि अन्य अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पाचोरा-भडगावच्या मातीत देशसेवेची परंपरा – किशोर पाटील
आमदार किशोर पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात पाचोरा-भडगाव मतदारसंघात सर्वाधिक शहीद जवान असून त्यांच्या बलिदानामुळे या परिसरातील तरुणांमध्ये देशसेवेची प्रेरणा निर्माण होत आहे. शहीद कुटुंबीयांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असून, गावागावांत ग्रंथालयासह सुसज्ज स्मारके उभारण्याचा हा उपक्रम शहीदांच्या स्मृती खऱ्या अर्थाने चिरंतन करणारा आहे, असे त्यांनी सांगितले.
२९ ठिकाणी उभी राहणार प्रेरणास्थळे – जिल्हाधिकारी रोहन घुगे
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जळगाव जिल्ह्यात २९ ठिकाणी शहीद स्मारके उभारण्यात येत आहेत. ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून या २९ गावांमधून आणलेली माती एकत्र करून भूमिपूजन व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. शहीद जवानांचा त्याग भावी पिढीच्या कायम स्मरणात राहावा आणि त्यातून संरक्षण, देशसेवा व राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
शहीदांच्या बलिदानाला अभिवादन – शंभू पाटील
परिवर्तन संस्थेचे प्रमुख शंभू पाटील यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडताना सांगितले की, देशसेवेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांना नमन करण्याचा हा दिवस आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शहीदाचे त्यांच्या गावात स्मारक उभारले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचे तसेच शहीद जवानांचे बलिदान आणि देशप्रेमाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. शहीद स्मारकांच्या माध्यमातून हा इतिहास आणि त्यांचा त्याग सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.
‘तिरंगे में लिपटा बेटा…’ अन् सभागृहाचे डोळे पाणावले
सोहळ्यात शहीद कुटुंबीयांच्या त्यागाचा उल्लेख करताना व्यक्त करताना पालकमंत्र्यांनी या ओळींचा सभागृहात उल्लेख करताच सभागृहातील वातावरण अधिकच भावूक झाले —
“तिरंगे में लिपटा बेटा जब आख़िरी बार घर आया होगा,
आँखें माँ की रोई होंगी, मगर सिर गर्व से ऊँचा हुआ होगा…”
या शब्दांनी वीरमातेच्या दुःखामागील राष्ट्राभिमानाची भावना जणू बोलकी झाली. उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले आणि काही क्षण सभागृह भावनांनी स्तब्ध झाले.
शिस्तबद्ध आयोजनाने सोहळ्याची उंची वाढवली
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. पोलीस बँड पथकाचे संचलन, २९ गावांतील मातीचे स्वतंत्र कलश, भूमिपूजनस्थळाची मांडणी, शहीद परिवारांचा सन्मान आणि सभागृहातील कार्यक्रम यांचा सुरेख समन्वय साधण्यात आला. शहीद कुटुंबीयांना कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याने संपूर्ण सोहळ्याला कृतज्ञतेची आणि राष्ट्रभावनेची वेगळी उंची प्राप्त झाली.
चौकट : माहितीपटातून ३२ शहीदांच्या शौर्यगाथेला उजाळा
क्रांतिदिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील ३२ शहीद जवानांच्या शौर्य, त्याग आणि देशसेवेच्या प्रेरणादायी गाथेवर विशेष माहितीपट तयार करण्यात आला होता. कार्यक्रमात हा माहितीपट प्रदर्शित होताच शहीद जवानांच्या आठवणींनी सभागृह भारावून गेले. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या ३२ शूरवीरांचा पराक्रम पडद्यावरून पुन्हा जिवंत झाला; वीर माता-पिता, वीर पत्नी आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानासोबत अश्रूही तरळले. क्रांतिदिनी शहीदांच्या स्मृतींना दिलेली ही मानवंदना सोहळ्यातील अत्यंत हृदयस्पर्शी क्षण ठरली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन निवेदक हर्षल पाटील यांनी केले तर आभार सैनिकी अधिकारी कार्यालयाचे कल्याण संघटक विश्वनाथ उगले यांनी मानले.कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, परिवर्तन संस्थेचे प्रमुख शंभू पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, कर्नल श्री. मल्होत्रा यांच्यासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक विश्वनाथ उगले, मारोती घुगे, समाधान धनगर, रतिलाल महाजन, विनायक महाजन अधिकारी – कर्मचारी, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामे जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
