साईमत न्यूज नेटवर्क –
नांदेड : शहरातील तरोडा नाका परिसरातील राहुल कॉलनी येथे शनिवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. २६ वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या आईवर घरातच हल्ला केल्यानंतर काही वेळातच स्वतःचे जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत आईचा मृत्यू झाला असून, मुलानेही आत्महत्या केल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
राहुल कॉलनी परिसरात चौथरे कुटुंब वास्तव्यास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास २६ वर्षीय प्रतीक चौथरे याने घरात आपल्या ५० वर्षीय आईवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली. त्यानंतर प्रतीक घरातील दुसऱ्या खोलीत गेला. काही वेळाने त्याने तेथे आत्महत्या केल्याचे समोर आले.
दरम्यान, चौथरे यांच्या घरातून संशयास्पद आवाज ऐकू आल्याने शेजाऱ्यांना घरात काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आला. त्यांनी घराची पाहणी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
प्रतीकचे वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. ते घरी नसतानाच ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यामुळे घरात नेमके काय घडले, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास केला जात आहे.
आईवर हल्ला केल्यानंतर प्रतीकने स्वतःचे जीवन का संपवले, यामागे कोणते कारण होते, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत. या तपासातूनच या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
