सलग दोन दिवस खात्यातून ९८-९८ हजार गायब ग्रामीण भागातील खातेदारांमध्ये खळबळ
साईमत /धानोरा, ता. चोपडा / प्रतिनिधी
सायबर गुन्हेगारांनी आता शहरांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, धानोरा येथील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यातून अवघ्या दोन दिवसांत तब्बल १ लाख ९६ हजार रुपये परस्पर लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलग दोन दिवस प्रत्येकी ९८ हजार रुपयांचे व्यवहार झाल्याने परिसरातील शेतकरी तसेच बँक खातेदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
धानोरा येथील शेतकरी दीपक रोहिदास साळुंखे (वय ३५) यांच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने ७ ऑगस्ट रोजी ९८ हजार रुपयांची रक्कम परस्पर वळती केली. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांच्या खात्यातून ९८ हजार रुपयांचा व्यवहार करण्यात आला. अशा प्रकारे दोन स्वतंत्र व्यवहारांत साळुंखे यांच्या खात्यातून एकूण १ लाख ९६ हजार रुपये काढून घेण्यात आले.
खात्यातील मोठी रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी तातडीने बँक व्यवहारांची माहिती घेतली. आपण सायबर फसवणुकीचे बळी ठरल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणातील अज्ञात संशयितांचा शोध सुरू केला आहे.
सलग दोन दिवस एकाच रकमेचे व्यवहार झाल्याने सायबर भामट्यांनी नेमकी कोणती पद्धत वापरून खात्यातील रक्कम हडप केली, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. संबंधित संशयिताने खात्यात प्रवेश कसा मिळविला, रक्कम कोणत्या बँक खात्यात किंवा माध्यमातून वळती करण्यात आली, तसेच या फसवणुकीमागे एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास सायबर पोलिसांकडून केला जात आहे.
ऑनलाइन व्यवहाराशी संबंधित तांत्रिक बाबींची पडताळणी करण्याबरोबरच व्यवहारांचा माग काढण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ग्रामीण भागही सायबर भामट्यांच्या रडारवर
मोबाईल, इंटरनेट बँकिंग, यूपीआय तसेच विविध ऑनलाइन सेवांचा वापर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिजिटल व्यवहार वाढत असतानाच सायबर फसवणुकीचे प्रकारही आता गावागावांत पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य खातेदार सायबर भामट्यांच्या निशाण्यावर येत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी करून बँक खाते, एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती, ओटीपी, यूपीआय संकेतांक अथवा अन्य गोपनीय माहिती मागितल्यास ती कोणत्याही परिस्थितीत देऊ नये. तसेच संशयास्पद संदेश, संकेतस्थळ किंवा अनोळखी दुव्यावर क्लिक करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी. ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलंब न करता संबंधित बँक आणि पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
