जळगावला पुन्हा यलो अलर्ट; वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट जोरदार पावसाचा इशारा
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच हवामान विभागाने रविवारी पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी राज्यातील जळगावसह १३ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील उर्वरित भागांत आकाश ढगाळ राहण्यासह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी यापूर्वी सलग दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या कालावधीत जिल्ह्यात अपेक्षित पावसाची नोंद झाली नाही. अनेक भागांत ढग दाटून येत असतानाही पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. आता रविवारी पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे.
दरम्यान, वातावरणात अचानक बदल होऊन काही भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उघड्यावर थांबणे टाळावे, तसेच झाडे, विजेचे खांब आणि कमकुवत बांधकामांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीही शेतातील कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
पावसासोबत वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटणे, वीजपुरवठा खंडित होणे किंवा किरकोळ नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आता हवामान विभागाचा हा अंदाज प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो आणि जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
