वाहतुकीला दिलासा बायपासच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जळगाव बाह्यवळण मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या पोहोच रस्त्यावरील रिटेनिंग वॉलचे काही पॅनेल ढासळल्याने बंद करण्यात आलेला बायपास मार्ग आता टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, १५ ऑगस्टपासून धुळे ते नागपूर दिशेची एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे.
जळगाव बाह्यवळण मार्गावरील मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेवरील उड्डाणपुलांच्या पोहोच रस्त्यावरील RE Wall चे काही पॅनेल ३१ जुलै रोजी ढासळल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेनंतर कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून बाह्यवळण मार्गावरील संपूर्ण वाहतूक शहरातील महामार्गावर वळविण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
घटनेची गंभीर दखल घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. संबंधित रेल्वे उड्डाणपुलाची तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात येत असून, पोहोच रस्त्यावरील RE Wall ची दुरुस्ती सुरू आहे. कामाचा वेग वाढवून पहिल्या टप्प्यातील दुरुस्ती १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर १५ ऑगस्टपासून धुळे ते नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बायपासचा एक मार्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पुन्हा शहरातून जाण्याची आवश्यकता राहणार नाही. परिणामी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, बायपासचा दुसरा मार्ग सुरू करण्यासाठी पुढील टप्प्यातील दुरुस्तीचे काम आवश्यक आहे. या कामाचे स्वतंत्र वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव प्रकल्प कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊनच बायपासवरील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनधारकांनी प्रशासनाने केलेल्या वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वाहतुकीतील बदलामुळे नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
बायपासचा एक मार्ग सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, उर्वरित दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही दिशेची वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
