महापौर कार्यालय, मेट्रो आणि शेअर बाजाराला धमकी उडवण्याचा ई-मेलमध्ये दावा
साईमत /मुंबई/ प्रतिनिधी
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. महापौर कार्यालयासह मुंबई मेट्रो, शाळा तसेच शेअर बाजाराची इमारत उडवून देण्याचा दावा या धमकीच्या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. येत्या १५ ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
शुक्रवारी सकाळी महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर हा धमकीचा संदेश प्राप्त झाला. या संदेशात खलिस्तान समर्थक घोषणा तसेच काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये आणि नागरिकांनी मेट्रो प्रवास टाळावा, असा इशाराही ई-मेलद्वारे देण्यात आला आहे.
महापौर रितू तावडे यांना यापूर्वीही दोन वेळा अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते. त्यामुळे या नव्या धमकीनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने मुंबई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्यामागे कोण व्यक्ती किंवा गट आहे आणि धमकी देण्यामागचा उद्देश काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. ई-मेलचा आयपी ॲड्रेस, पाठविण्याचे ठिकाण तसेच प्रेषकाची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सामग्री आढळून आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका कार्यालय, महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान, वारंवार येणाऱ्या धमकीच्या ई-मेलमुळे मुंबईतील महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून धमकीमागील सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.
