साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव शहर महानगरपालिकेचे कामकाज अधिक पारदर्शक, गतीमान आणि अभ्यासपूर्ण व्हावे या उद्देशाने नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी नाशिक येथे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ झाला आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट आणि शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या महापालिकेत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या लक्षणीय आहे. प्रशासकीय कामकाजाची बारकावे, नियमावली आणि तांत्रिक बाबी समजून घेतल्यास महासभेत जनतेचे मूलभूत प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतील, ही भूमिका डोळ्यांसमोर ठेवून महापौर दीपमाला काळे यांनी या प्रशिक्षणासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. यापूर्वी हे प्रशिक्षण शिबीर नियोजित करण्यात आले होते; मात्र आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याने ते पुढे ढकलावे लागले होते. अखेर सर्व अडथळे दूर झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजता नगरसेवक मनपा प्रांगणातून खाजगी बसने नाशिकसाठी रवाना झाले.
या दोन दिवसीय शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तज्ज्ञ मार्गदर्शक नगरसेवकांना महापालिकेची प्रत्यक्ष कार्यपद्धती, कायदे, बजेट, तसेच महासभेत विषय मांडण्याची तंत्रे यावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
”नगरसेवक प्रशिक्षित असणे ही काळाची गरज आहे. शहरात विकासकामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी आणि महासभेत नागरिकांचे प्रश्न अभ्यासू पद्धतीने मांडण्यासाठी हे प्रशिक्षण नगरसेवकांसाठी मैलाचा दगड ठरेल.”
— दीपमाला काळे, महापौर, जळगाव शहर महानगरपालिका
या उपक्रमामुळे नगरसेवकांच्या अभ्यासू वृत्तीला वाव मिळून आगामी काळात मनपाच्या कामकाजात सकारात्मक बदल दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
