साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
हिरोशिमा दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. ६) जळगाव येथील गांधी उद्यानात गांधी रिसर्च फाउंडेशन व हरिजन सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जागतिक शांतता, बंधुता व अहिंसेचा संदेश दृढ करण्याचा आणि मानवी विनाशाची पुनरावृत्ती टाळण्याचा संकल्प याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरकुमार सन्याल, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेश यादव, राष्ट्रीय सचिव संजय राय, रामकुमार मंडल, निशा त्यागी आणि गांधी तीर्थचे उदय महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
१०० हून अधिक देश-विदेशातील प्रतिनिधींचा सहभाग
शुक्रवार, दि. ७ ऑगस्टपासून गांधी तीर्थ येथे हरिजन सेवक संघाच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात देशभरातील विविध राज्यांसह परदेशातून आलेले सुमारे १०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
मुख्य विषय: गांधीवादी विचार, सामाजिक समरसता, बंधुता, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता.
अधिवेशनादरम्यान विविध मार्गदर्शन सत्रे, खुली चर्चा आणि विचारमंथनाच्या माध्यमातून आगामी काळातील संघटित कार्याची दिशा निश्चित केली जाणार आहे.
