साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
असोदा–मन्यारखेडा मार्गावरील रेल्वे अंडरपासमधील साचलेले पाणी उपसल्यानंतरही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे परिसरातील सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचणे अशक्य झाले असून खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाच्या शेतीकामांचा पुरता बंबार्ट झाला आहे.
खासदारांच्या सूचनेनंतर पाणी काढले, पण रस्ता पूर्ववत नाही
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काही दिवसांपूर्वी खासदार स्मिता वाघ यांनी पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पाहणी करताना या अंडरपासमधील पाणी तातडीने उपसण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. प्रशासनाने पाणी उपसून मोकळे केले खरं, पण रस्ता अजूनही बंदच ठेवल्याने शेतकऱ्यांचे हाल कायम आहेत.
चुकीचे नियोजन आणि कंत्राटदाराची बेफिकिरी
स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरपास परिसरात ‘पेव्हर ब्लॉक’ बसवण्याचे काम सुरू असताना पाण्याचा नैसर्गिक निचरा करणारी मोरीच बंद करण्यात आली. हे काम उन्हाळ्यातच पूर्ण होणे अपेक्षित असताना मुदत उलटूनही अपूर्ण ठेवण्यात आले. त्यामुळेच ही बिकट परिस्थिती ओढावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या कामाच्या कंत्राटदाराबाबतही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी बी. एन. अग्रवाल यांचे नाव घेतले असले, तरी त्यांनी या कामाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगून हात वर केले आहेत. त्यामुळे नक्की कोण जबाबदार आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
खरीप हंगामावर संकट
असोदा शिवारातील बहुतांश शेतजमिनी या अंडरपासच्या पलीकडे आहेत. मार्ग बंद असल्याने मशागत, खतफवारणी आणि पीक संरक्षणाची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. ऐन हंगामात शेतात जाता येत नसल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मार्ग त्वरित खुला करावा: अंडरपासची दुरुस्ती करून शेतात जाण्याचा रस्ता तातडीने मोकळा करावा.
चौकशीची मागणी: काम अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदाराची आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी.
नुकसानभरपाई द्यावी: या दिरंगाईमुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्यास प्रशासनाने शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी.
