साईमत न्यूज नेटवर्क –
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण ते तळेरे जाणाऱ्या मार्गावर साळीस्ते स्मशानभूमीजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विशाल विजय लिंगायत (वय २२, रा. साळीस्ते-रामेश्वरवाडी, ता. कणकवली) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल हा तळेरे-वाघाचीवाडी येथील पेट्रोल पंपावर काम करत होता. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दाढ दुखत असल्याने डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैसे आणण्याकरिता तो मित्राची दुचाकी घेऊन साळीस्ते येथील घरी गेला होता. घरून परत कामावर जात असताना साळीस्ते स्मशानभूमीजवळ महामार्गाच्या कडेला एक कंटेनर निष्काळजीपणे उभा होता.
यावेळी विशालच्या दुचाकीची कंटेनरला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर विशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विशालला तातडीने रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
विशाल हा साळीस्ते येथे आपल्या काकांसोबत राहत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. त्याचे आई-वडील व बहीण कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. या घटनेमुळे लिंगायत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघाताची फिर्याद विशालचे काका मयुरेश लिंगायत यांनी दिली. त्यानुसार कंटेनरचालक पुरुषोत्तम नंदलाला उपाध्याय (वय ६५, रा. मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध महामार्गावर निष्काळजीपणे कंटेनर उभा करून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
