कंटेनरच्या धडकेत चालक–सहचालक अडकले, केबिनचा चुराडा झालेल्या वाहनातून दोघांची केली सुटका पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण
साईमत /नवापूर/ प्रतिनिधी
धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कोंडाईबारी घाट पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आला आहे. घाटाच्या पायथ्याशी गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव कंटेनरने आधीच अपघातग्रस्त झालेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनरच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला असून, चालक आणि सहचालक गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह बचाव पथक आणि रुग्णवाहिका कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची तीव्रता पाहता कंटेनरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालक व सहचालकाला बाहेर काढणे मोठे आव्हान होते. मात्र पोलिस आणि बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करत दोघांना सुरक्षित बाहेर काढले.
कंटेनर चालक मोहम्मद नेशी आणि सहचालक तालीम खान (दोघे रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर दोघांना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, कोंडाईबारी घाटाच्या परिसरात एक ट्रक अपघातानंतर महामार्गावर पलटी झाला होता. त्याचवेळी गुजरातकडून येणाऱ्या कंटेनरने या ट्रकला धडक दिली. धडकेच्या जोरामुळे कंटेनरचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अपघातस्थळी पोलीस हवालदार कैलास मोरे, पोलीस नाईक प्रवीण मोरे, पोलीस कर्मचारी श्याम पावरा, जितेंद्र सांगळे तसेच १०३३ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य केले. जखमींना वेळेत बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, कोंडाईबारी घाटातील अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि वाहनांचा वाढता वेग यामुळे घाट परिसरात अपघाताचा धोका कायम असतो. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी वेग नियंत्रणासाठी उपाययोजना, आवश्यक सूचना फलक, संरक्षक कठडे आणि इतर सुरक्षा सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
