खामखेडजवळ रेल्वेखाली आल्याने ४० वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
साईमत /मलकापूर/ प्रतिनिधी
तालुक्यातील खामखेड रेल्वे परिसरात रेल्वेखाली आल्याने ४० वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे रेल्वे कर्मचारी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामखेड रेल्वे परिसरातील अप लाईनवरील कि.मी. ४८६/१३ ते ४८६/१५ दरम्यान पंतनगर, मलकापूर येथील रेल्वे कर्मचारी ईश्वर गुरचळ (वय ४०) हे रेल्वेखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
याबाबत रेल्वे ट्रॅकमन समाधान भगवान पंडित (वय ३२), युनिट क्र. ७, खामखेड स्टेशन यांनी उपस्टेशन प्रबंधक कार्यालयामार्फत लेखी मेमोद्वारे माहिती दिली. या मेमोमध्ये अप लाईनवर अंदाजे ३८ ते ४० वर्षे वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह सायंकाळी ५.५७ वाजण्यापूर्वी आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीची ओळख ईश्वर गुरचळ अशी पटली.
या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक २२/२०२६ बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुभाष सरकटे करीत आहेत.
