व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृतीचा संकल्प
साईमत /भडगाव / प्रतिनिधी :
व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, माउंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘१० कोटी नशामुक्त भारत महाअभियान’चा शुभारंभ भडगाव येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
या अभियानाचे उद्घाटन नगरसेवक अमोल नाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक, ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रातील बंधू-भगिनी व मान्यवरांनी व्यसनमुक्त भारत घडविण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. तसेच समाजातील तरुणाईसह सर्व घटकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी ब्रह्माकुमारी मनीषा दीदी यांनी अभियानामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी केवळ जनजागृती नव्हे तर मूल्यशिक्षण, सकारात्मक विचारसरणी आणि राजयोग ध्यानाच्या माध्यमातून व्यक्ती परिवर्तनाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होऊन निरोगी व संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
हे महाअभियान संपूर्ण भडगाव तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था तसेच विविध सामाजिक घटकांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमास ब्रह्माकुमारी सेवा केंद्राचे पदाधिकारी, सेवाभावी कार्यकर्ते, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
