दोन हजार रुपयांच्या वादातून हातात चॉपर घेऊन हॉटेलमध्ये घुसून तोडफोड, लाखाहून अधिक नुकसान
साईमत /ठाणे / प्रतिनिधी :
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गजबजलेल्या स्टेशन रोडवर मंगळवारी सकाळी एका हॉटेलमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन हजार रुपयांच्या मागणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हिंसक घटनेत झाल्याने हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
माहितीनुसार, स्टेशन रोडवरील कॅनन हॉटेलमध्ये आरोपीने सुरुवातीला कर्मचाऱ्यांकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आल्यानंतर त्याने संतापाच्या भरात धारदार चॉपर घेऊन हॉटेलमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत हॉटेल व्यवस्थापकाला जीवे मारण्याची धमकी दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांची एकच धावपळ उडाली.
यानंतर आरोपीने हॉटेलमधील काचा, फर्निचर तसेच इतर साहित्याची तोडफोड केली. काचा फुटल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत हॉटेलचे सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.
तोडफोडीच्या वेळी अनेक ग्राहक हॉटेलमध्ये उपस्थित होते. फुटलेल्या काचांमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कर्मचारी आणि ग्राहकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनाली दिलीप आहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकासारख्या अत्यंत वर्दळीच्या आणि संवेदनशील परिसरात उघडपणे धारदार शस्त्र घेऊन एका व्यक्तीने हॉटेलमध्ये घुसून धमकी देत तोडफोड केल्याच्या घटनेमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
