साईमत -जळगाव- प्रतिनिधी | शहरातील महामार्गाच्या दुरवस्थेने आणि प्रशासनाच्या अनास्थेने आज आणखी एका निष्पाप महिलेचा बळी घेतला आहे. हॉटेल दरबार आणि सीएनजी गॅस पंपासमोरील रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खरडून ठेवल्यामुळे निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे भीषण अपघात घडून मंगला अर्जुन माळी (वय ५५) या भाजी विक्रेत्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचा मुलगा भरत माळी किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगला माळी या नेहमीप्रमाणे मुलगा भरत माळी याच्यासोबत दुचाकीवरून पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जात होत्या. हॉटेल दरबारजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला असतानाच, मागून भरधाव वेगाने आलेल्या अवजड टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच मंगला माळी रस्त्यावर कोसळल्या आणि टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.
नागरिकांनी पाठलाग करून टँकरचालकाला पकडले
अपघात घडल्यानंतर टँकरचालकाने मानवता दाखवून थांबण्याऐवजी पाळधीच्या दिशेने वाहनासह पलायन केले. मात्र, घटनास्थळावरील संतप्त नागरिकांनी धाडस दाखवून त्याचा पाठलाग केला. अखेर आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर नागरिकांनी टँकर अडवला आणि चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेनंतर मृत मंगला माळी यांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रचंड संताप व्यक्त केला. “हा केवळ अपघात नसून खड्ड्यांमुळे झालेला प्रशासकीय बळी आहे,” असा थेट आरोप नातेवाईकांनी केला. रस्त्याची रखडलेली दुरुस्ती आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या दुर्घटनेस जबाबदार असल्याचा घणाघात नागरिकांनी केला.
फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या टँकरचालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच महामार्गावरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी तीव्र मागणी जळगावकर नागरिकांमधून केली जात आहे. एमआयडीसी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
