साईमत वृत्तसेवा | नवी दिल्ली
थायलंडमधील फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरण्यापूर्वी भीषण एअर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. अचानक निर्माण झालेल्या या तीव्र अशांततेमुळे विमानातील १२ हून अधिक प्रवासी जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेदरम्यान विमानात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांच्या किंचाळ्या, आरोळ्या आणि गोंधळामुळे विमानातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान दिल्लीच्या दिशेने प्रवास करत असताना उंचीवर अचानक तीव्र टर्ब्युलन्स निर्माण झाला. या धक्क्यांमुळे विमान काही क्षण वेगाने खाली झेपावल्याचा अनुभव प्रवाशांनी सांगितला. त्यामुळे अनेक प्रवासी आपल्या जागेवरून उडाले, तर काहीजण विमानातील वस्तूंवर आदळल्याने जखमी झाले. काही प्रवाशांच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून, वाढलेल्या दाबामुळे काहींच्या कानाच्या पडद्यांना इजा झाली. काही प्रवाशांच्या कानातून रक्तस्राव झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. विमानाच्या आतील छताचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या विमानातील एका प्रवाशाच्या भावाने सांगितले की, “माझा भाऊ एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानात होता. विमान उंचीवर असताना अचानक भीषण टर्ब्युलन्स सुरू झाला. प्रचंड दाबामुळे विमान काही क्षणांत खाली झेपावले. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या कानांवर परिणाम झाला, तर काहीजण आदळल्याने त्यांची हाडेही मोडली.”
या घटनेत एका प्रवाशाच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी आणि चालक दलातील सदस्य किरकोळ जखमी झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दिल्ली विमानतळाजवळील वैद्यकीय सुविधा केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात आले. तेथे एअर इंडियाची विमानतळावरील टीम आणि वैद्यकीय कर्मचारी जखमींना आवश्यक मदत करत आहेत.
घटनेनंतर प्रवाशांनी सांगितले की, दिल्लीत लँडिंग होण्यापूर्वी विमान अचानक जोरात हलू लागले आणि काही क्षणांसाठी खाली येऊ लागल्याचा अनुभव आला. त्यामुळे विमानात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवासी घाबरून ओरडू लागले, तर काहींनी देवाचा धावा सुरू केला. काही वेळासाठी विमानात अफरातफर माजली होती. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवले.
दरम्यान, एअर इंडियाच्या प्रवक्त्याने या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “प्रवासी आणि चालक दलाच्या सदस्यांची सुरक्षा व आरोग्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. जखमी प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत दिली जात असून संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत.”
एअर टर्ब्युलन्स म्हणजे नेमके काय?
एअर टर्ब्युलन्स म्हणजे वातावरणातील हवेच्या प्रवाहात अचानक निर्माण होणारी अस्थिरता किंवा अशांतता होय. सामान्य परिस्थितीत हवा स्थिर प्रवाहात वाहत असते. मात्र, विविध नैसर्गिक कारणांमुळे तिच्या वेगात आणि दिशेत अचानक बदल होतो आणि विमानाला जोरदार धक्के बसतात.
टर्ब्युलन्स निर्माण होण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
- पृथ्वीचे तापमान वाढल्याने गरम हवा वरच्या दिशेने आणि थंड हवा खाली सरकते. त्यामुळे थर्मल टर्ब्युलन्स तयार होतो.
- पर्वतरांगांवर आदळणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे वर-खाली होणाऱ्या हालचालींमुळे अशांतता निर्माण होते.
- उंच वातावरणात वाहणाऱ्या जेट स्ट्रीमच्या वेगातील अचानक बदलामुळे क्लिअर एअर टर्ब्युलन्स होऊ शकतो.
- मेघगर्जना, वादळी हवामान किंवा ढगांच्या हालचालींमुळेही विमानाला तीव्र धक्के बसू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, आधुनिक प्रवासी विमाने अशा टर्ब्युलन्सचा सामना करण्यासाठी सक्षम असतात. मात्र, अशा वेळी प्रवाशांनी सीटबेल्ट बांधून ठेवणे हा सर्वात प्रभावी आणि सुरक्षित उपाय मानला जातो.
