नगरपरिषद कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी
साईमत /भडगाव / प्रतिनिधी
शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा आणि नगरपरिषद कार्यालयाकडे पोहोचण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. पावसाळ्यामुळे या रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून, नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता नागरिकांमध्ये आता “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
भडगाव शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजीपाला मार्केट, विविध व्यापारी आस्थापना, बँका तसेच नगरपरिषद कार्यालयाकडे जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर नागरिकांसह वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, शहरातील सर्वाधिक वापराच्या या रस्त्याची अवस्था खराब असूनही प्रशासनाकडून आवश्यक ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाचे पाणी त्यामध्ये साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच पावसाच्या काळात या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या खराब अवस्थेचा परिणाम शहरातील व्यापाऱ्यांवरही होत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे ग्राहकांना बाजारपेठेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, त्याचा थेट परिणाम व्यापारावर होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही या खड्डेमय मार्गामुळे अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांची नियमित पाहणी करून वेळेत दुरुस्ती करणे ही नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी असताना या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती होणे अपेक्षित असताना अद्यापही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे मेन रोडवरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करावे, केवळ तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात तसेच रस्त्याची नियमित देखभाल करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
