विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढाकार विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर व वह्यांचे वाटप
साईमत /फैजपूर/ प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार मिळावा या उद्देशाने विपुल विलास बोरोले यांच्या जयंतीनिमित्त विपुल विलास बोरोले प्राथमिक विद्यामंदिरात विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून स्व. विपुल बोरोले यांच्या स्मृतींना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या संचालक मंडळातील मान्यवरांच्या हस्ते स्व. विपुल विलास बोरोले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळ, फैजपूरचे सहसचिव प्रा. डॉ. विलास चुडामण बोरोले यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव स्व. विपुल बोरोले यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, वह्या तसेच इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांनी समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शिरा व पोहे असा अल्पोपहार देण्यात आला.
इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या कु. माही अमोल जैन आणि कु. भक्ती ललित बोंडे या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी श्री. पंडित हिरामण कोल्हे, श्री. पांडुरंग दगडू सराफ, श्री. मोहन सुधाकर महाजन, सचिव डॉ. उमेश भालचंद्र चौधरी, चेअरमन श्री. पी. के. चौधरी यांच्यासह सौ. भाग्यश्री सरोदे, कु. एशिका सरोदे उपस्थित होते. तसेच कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आय. एम. तडवी, ज्येष्ठ शिक्षक श्री. एल. जे. बोंडे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विपुल विलास बोरोले प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. एस. जी. ताजने यांनी केले. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.स्व. विपुल बोरोले यांच्या स्मृतीनिमित्त राबविण्यात आलेला हा शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
